इस्लामाबाद : कोरेना व्हायरसमुळे पाकिस्तान एकीकडे जगासमोर दयेची भीक मागत असताना दुसरीकडे त्यांचा घाणेरडा चेहरा उघड झाला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ५०० च्या वर गेली असून या रुग्णांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यांच्या वास्तव्यासाठी तेथील काश्मीरी लोकांची घरे रिकामी करण्यास जबरदस्ती करण्यात येत आहे.
युनायटेड काश्मीर पिपल्स नॅशनल पक्षाचे अध्यक्ष सरदार शौकत अली काश्मीरी यांनी पाकिस्तान सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. पंजाब प्रांतातील कोरोनाग्रस्त रुग्णांना काश्मीरच्या मीरापूर जिल्ह्यामध्ये पाठविण्यात येत आहे. असे केल्याने पंजाबमधील शहरांना कोरोनापासून वाचविले जाऊ शकते. अशा प्रकारे पाकिस्तान स्वत:ला वाचविण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरला संकटात टाकत असल्याचा आरोप काश्मीरी यांनी केला आहे.
यामागे पाकिस्तानचे मोठा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यास आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आर्थिक मदत मिळविता येईल असा सूप्त हेतू आहे. ही पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्काराचा क्रूरपणा आहे. मीरापूरच्या लोकांनी या त्यांच्या चलाखीला ओळखले असून कोरोनाग्रस्तांना आणण्यास विरोध करत आहेत.
काश्मीरी यांनी सांगितले की, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मीरापूर आणि आजूवाजूच्या लोकांना त्यांची राहती घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अनेक कार्यालयीन इमारती आणि हॉस्पिटलही बळजबरीने रिकामे करण्यात येत आहेत.