दुबई: जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी भारतात केंद्र सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केले आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे.
यातच एका दुबईतील २७ वर्षीय भारतीय गर्भवती महिलेने तिच्या प्रसूतीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या महिलेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने प्रसूतीसाठी घरी म्हणजेच भारतात जाण्यास कोर्टाने मदत करावी, असे म्हटले आहे.
गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, मुळच्या केरळ राज्यातील असलेल्या गीता श्रीधरन यांनी सांगितले की, त्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रसूतीसाठी भारतात परतायचे आहे. रिपोर्टनुसार, गीता श्रीधरन या पती नितीन चंद्रन यांच्यासोबत दुबईत राहत आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. यामध्ये भारतात परतण्यासाठी मदत मागितली आहे.
कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. कोरोनावर उपाय योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावले उचलली आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. येत्या 27 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहे. या चर्चेत कोरोना लढ्याची पुढची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतात वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, भारतातील 78 जिल्हे कोरोना फ्री झाले आहे. मात्र, गेल्या 24 तासांत 1409 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत देशात 21 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.