लीमा - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगात थैमान घातले आहे. जगातील छोट्या-मोठ्या अनेक देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. दक्षिण अमेरिकेतील एक छोटा देश असलेल्या पेरूमध्येही कोरोनाने हाहाकार उडवलेला आहे. दरम्यान, याच पेरू देशात तंतारा शहरातील महापौरांनी अटकेची कारवाई टाळण्यासाठी चक्क मृत्यूचे सोंग घेतल्याचे समोर आले आहे.
तंतारा शहराचे महापौर रोलांडो यांच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन करून मित्रांसोबत मद्यापान केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र पोलीस त्यांना अटक करण्यासाठी पोहोचल्यावर त्यांनी जे पाहिले ते धक्कादायक होते.
पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी पोहोचल्यावर रोलांडो यांनी मृत्यू झाल्याचे सोंग घेतले आणि ते शवपेटीमध्ये लपून बसले. त्यांनी तोंडावर मास्क लावलेला होता. पोलिसांनी शवपेटी उघडून त्यांचे छायाचित्र टिपले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली. तेव्हाही ते दारूच्या नशेतच होते.
या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, रोलांडो हे मित्रांसोबत बसून मद्यपान करत होते. हा नियम्ंचा भंग होता. तसेच रोलांडो यांच्यावर कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले संकट गांभीर्याने न घेतल्याचा आणि परिसरात संरक्षणाची योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाच्या आपत्तीदरम्यान योग्य व्यवस्थापन न केल्याने स्थानिक लोक या महापौरांवर नाराज आहेत.पेरूमध्ये गेल्या ६६ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली नाही. पेरूमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, येथील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार २० पर्यंत पोहोचला आहे. तसेच देशात ३ हजार २४ जणांचा मृत्यू झाला आहे.