पूर्व आफ्रिकेत समुद्री चाच्यांविरोधातील मोहिमेसाठी रवाना झालेल्या दक्षिण कोरियाच्या एका युद्धनौकेवरील जवान कोरोना बाधित झाले आहेत. जहाजावरील २४७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दक्षिण कोरियातील लष्करात आजवर कोरोनाची लागण झालेली ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. मुनमू द ग्रेट या युद्धनौकेवर असलेल्या ३०१ जवानांना परत आणण्यासाठी लष्कराची दोन लढाऊ विमानं पाठवण्यात आली होती, अशी माहिती देशाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. (Coronavirus update most of south korean warship crew infected with covid)
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संबंधित युद्धनौका एका ठिकाणी काही सामग्री भरण्यासाठी थांबलेली असताना याच वेळी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धक्कादायक बाब अशी की जहाजावर असलेल्या एकाही व्यक्तीचं कोरोना विरोधी लसीकरण झालेलं नाही. आज दक्षिण कोरियात १२५२ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. सलग १३ व्या दिवशी द.कोरियात १ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
दक्षिण कोरियाहून एका पायलटसह एक विशेष पथक रवाना झाला असून हे जहाज आता परत आणण्याची देखील तयारी सुरू करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमित झालेल्या एकूण जवानांपैकी तीन जण आयसीयूमध्ये दाखल आहेत.