प्योंगयोंग (उत्तर कोरिया) - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभरात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनेक देशांनी अनिवार्य केलेला आहे. दरम्यान, आपल्या देशाता कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याचा दावा करणारा उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशाह किम जोंग उन हा आता कोरोनाला चांगलाच घाबरला आहे. देशात कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेऊन त्याने मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना कठोर शिक्षा देण्याची घोषणा केली आहे.
उत्तर कोरियामधून येत असलेल्या वृत्तांनुसार सणकी हुकूमशाह किम जोंग उन कोरोनाच्या भीतीने चिंतीत झालेला आहे. त्याने नागरिकांना मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. तसेच मास्क परिधान न करणाऱ्या, नियमभंग करणाऱ्या नागरिकांना तीन महिन्यांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेची घोषणा केली आहे. उत्तर कोरियात कोनाचा प्रसार रोखण्यासाठी किम जोंग याने ही घोषणा केली आहे.
रेडिओ फ्री एशिया ने दिलेल्या वृत्तानुसार मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांना पकडण्यासाठी विद्यार्थ्यांना गस्तीवर पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची विशेष भरती होणार आहे. तसेच मास्क परिधान न करता आढळणाऱ्या व्यक्तींची रवानगी थेट सक्तमजुरीसाठी करण्यात येईल.
आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचा दावा उत्तर कोरियाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशात कठोर प्रतिबंधांची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, जगभरात मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या दीड कोटींच्या पुढे पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ६ लाख २१ हजार ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे.