coronavirus: सदस्य देशांच्या दबावासमोर WHO झुकली, कोरोना विषाणूसंबधी तपासास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 08:12 AM2020-05-19T08:12:08+5:302020-05-19T08:17:45+5:30
कोरोना विषाणूच्या झालेल्या प्रसारासाठी जगातील अनेक देशांनी चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तसेच कोरोनावरून अमेरिका आणि चीन हे देश आमनेसामने आले आहेत.
जिनेव्हा - चीनमध्ये सुरुवात होऊन संपूर्ण जगात पोहोचलेल्या कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देशात हाहाकार उडाला आहे. तसेच कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जागतिक आरोग्य संघटनेच्या अनेक सदस्य देशांनी केली होती. अखेर या सदस्य देशांनी आणलेल्या दबावासमोर जागतिक आरोग्य संघटना झुकली असून, कोरोनासंबंधीच्या तपासास मान्यता दिली आहे.
कोरोना विषाणूच्या झालेल्या प्रसारासाठी जगातील अनेक देशांनी चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तसेच कोरोनावरून अमेरिका आणि चीन हे देश आमनेसामने आले आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.
आफ्रिकी आणि युरोपीय देशांसह अन्य देशांच्या संघटनेने कोरोनाच्या साथी संदर्भात सखोल मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणू हा चीनमधील एका प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. तर हा विषाणू कुठल्यातरी प्राण्यामधून माणसांमध्ये पोहोचल्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च
इस्राइलमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदी, मोदींनी दिल्या शुभेच्छा
लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक, गुन्हा दाखल
दरम्यान, कोरोनाबाबत अनेक देशांनी डब्ल्यूएचओच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले. वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळी रणनीती आखली. त्यामुळे आपल्याला जबर किंमत मोजावी लागत आहे, असा दावा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनिओ गुटारेस यांनी केला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे आलेल्या साथीबाबत एक स्वतंत्र तपास सुरू केला जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी सांगितले.