coronavirus: शी जिनपिंग यांना झाला कोरोनाचा संसर्ग? प्रचंड खोकल्यामुळे थांबवावे लागले भाषण
By बाळकृष्ण परब | Published: October 16, 2020 03:32 PM2020-10-16T15:32:55+5:302020-10-16T15:37:17+5:30
Xi Jinping News : कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या ठिकाणापासून सुरू झाला त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीजिंग - कोरोना विषाणूने गेल्या दहा महिन्यांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. सर्वसामान्यांसोबतच जगातील अनेक देशांचे प्रमुख आणि इतर बड्या असामींना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या ठिकाणापासून सुरू झाला त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी हाँगकाँगपासून जवळच असलेल्या शेन्जेंगमध्ये एका कार्यक्रमावेळी शी जिनपिंग सतत खोकत असल्याचे दिसून आले. तसेच या कार्यक्रमातील संबोधनावेळी शेवटच्या दहा मिनिटांमध्ये मोठ्या प्रमाणात खोकला सुरू झाल्याने त्यांना काही काळासाठी भाषण थांबवाले लागले. दरम्यान, जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी कुठलीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भाषणाचे लाइव्ह प्रसारण सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या सीसीटीव्हीवर सुरू होते. जेव्हा त्यांना जोराचा खोकला येऊ लागला, तेव्हा टीव्ही चॅनेलने जिनपिंग खोकत असताना दिसणारा भाग कापण्यास सुरुवात केली. मात्र या दरम्यान ऑडियोमध्ये त्यांच्या खोकण्याचा आवाज येत होता. तसेच एक अशी चित्रफित समोर आली ज्यामध्ये जिनपिंग हे तोंडावर हात धरून खोकताना दिसत आहेत.
या ऑडिओमध्ये जिनपिंग हे गळा साफ करण्यासाठी पाण्याच्या गुळण्या करत असल्याचे ऐकू येत होते. या प्रकारानंतर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची अफवा वेगाने पसरू लागली आहे. मात्र त्याला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, हाँगकाँगमधील लोकशाही समर्थक अॅपल टीव्हीनेसुद्धा जिनपिंग यांना खोकल्यामुळे आपला दौरा अर्धवट सोडून बीजिंगला परतावे लागल्याचा दावा केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा सापडू लागले आहेत. अधिकृतरीत्या दरदिवसी सुमारे १० हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. मात्र अनेक तज्ज्ञांना चीनने दिलेल्या आकडेवारीवर शंका आहे. चीनने पहिल्यांदाच आपला विकासदर कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे चीन खरी आकडेवारी लपवून चुकीची माहिती जगाला देत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.