नवी दिल्ली : अब्जावधी लोकांना हात धुण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यामुळे कोविड-१९ महामारी वेगाने पसरत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. गंभीर पाणीटंचाईमुळे जगातीलपाचपैकी दोन कुटुंबांना कोरोनाचा धोका आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी वारंवार संपूर्ण हात धुणे हा सर्वांत प्रभावी मार्ग आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तथापि, जगातील ३ अब्ज लोकांकडे हात धुण्यासाठी पाणी आणि साबण नाही. ४ अब्ज लोकांना वर्षातील किमान एक महिना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या ‘यूएन-वॉटर’ समूहाने म्हटले आहे.यूएन-वॉटरचे चेअरमन गिलबर्ट एफ. हाउंगबो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पाणी आणि सुरक्षित स्वच्छता याशिवाय जगणे ही लोकांसाठी अत्यंत संकटमय स्थिती आहे. पुरेशा गुंतवणुकीअभावी अब्जावधी लोक असुरक्षित आहेत आणि आता आपण परिणाम पाहत आहोत. शुद्ध पाणी आणि स्वच्छता यावरील गुंतवणूक वर्षानुवर्षे टाळली गेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण असुरक्षित झाला आहे. कोरोनाच्या संसर्ग आणि पुनसंसर्गाच्या साखळीत विकसित आणि अविकसित असे सारेच देश सापडले आहेत.हाउंगबो यांनी सांगितले की, २०३० सालापर्यंत जल पायाभूत सोयीसाठी किमान ६.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जगात व्हायला हवी, असे संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी सांगते. स्वच्छताविषयक गरजाच नव्हे, तर संभाव्य अन्न संकट टाळण्यासाठी सिंचनासाठीही गुंतवणूक व्हावी.येताहेत हात धुण्याचे गॅझेट्ससूत्रांनी सांगितले की, कमीत कमी पाण्यात हात कसे धुता येतील, यावर काही कंपन्या काम करीत आहेत. अमेरिकन स्टँडर्ड आणि ग्रोहे यासारखे ब्रँड असलेल्या जपानच्या लिक्सिल ग्रुप कॉर्पोरेशन ही कंपनी युनिसेफ आणि इतर भागीदारांसोबत या विषयावर काम करीत आहे. थोड्याशा पाण्यात हात धुता येतील, असे गॅझेट कंपनी विकसित करीत आहे.भारतात १ दशलक्ष डॉलरमध्ये ५ लाख युनिट बनवून वितरित करण्याची कंपनीची योजना आहे. त्याचा २.५ दशलक्ष लोकांना लाभ होईल.नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील जल संस्थेच्या प्राध्यापिका आणि युनिसेफच्या जल, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या प्रमुख क्लॅरिसा ब्रॉकलहर्स्ट यांनी सांगितले की, साथीच्या प्रतिकारासाठी तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहेच; पण पाण्याची दीर्घकालीन व्यवस्था करणेही आवश्यक आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविणे आवश्यक आहे.
CoronaVirus News: अब्जावधी लोकांना हात धुवायला पाणीच नसल्याने कोरोनाचा फैलाव- संयुक्त राष्ट्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 2:38 AM