मोदींच्या भीतीने दाऊदने तळ बदलला
By admin | Published: May 21, 2014 11:25 AM2014-05-21T11:25:12+5:302014-05-21T11:25:12+5:30
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमने मोदींना घाबरुन कराचीतील आपला तळ बदलून अफगाण -पाक सीमेवरील एका गावात मुक्काम हलवला आहे.
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सत्तेवर येणार हे नक्की होताच, पाकिस्तानच्या पोटात मात्र भीतीचा गोळा येत असल्याची चिन्हे आहेत. त्याची सुरुवातच १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमने कराचीतील आपला तळ बदलल्याच्या वृत्ताने झाली असून, तो अफगाण -पाक सीमेवरील एका गावात गेला आहे. नरेंद्र मोदी आता पंतप्रधानपदी येणार हे नक्की झाल्यानंतर, भाजपा नेता नितीन गडकरी यांचा पाकिस्तानी सुरक्षा विश्लेषक तारीक पीरजादा यांच्याशी वाद झाला. त्यानंतर भारत-पाक यांच्या संबंधातल्या विविध बातम्या प्रसिद्ध झाल्या. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दाऊदने कराची येथील आपला तळ हलविण्याचा निर्णय घेतला. दाऊद पाकिस्तानातच आहे अशी भारताची खात्री असताना पाकिस्तान मात्र हात वर करण्याचीच भूमिका निभवत आला आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दाऊदवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे ते सत्तेवर आल्यानंतर दाऊदवर कारवाई होणार, असे मानले जात आहे. गुप्तचर विभागाच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार कदाचित गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख अजित डोभाल यांची दाऊदवर कारवाई करण्यासाठी मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. अशा कारवाईसाठी त्यांची ख्याती आहे. माजी गृहसचिव व बिहारचे खासदार आर के सिंग यांचीही या कामी सरकारकडून मदत घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोदींच्या राज्यात दाऊदवर कारवाई होईल, असेच संकेत आहेत.
मोदींच्या शपथविधीसाठी नवाझ शरीफांना निमंत्रण
नरेंद्र मोदी २६ मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी सार्कमधील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचाही समावेश आहे. शरीफ निमंत्रण स्वीकारुन मोदींच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.