नवी दिल्ली, दि. 22 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये तीन वेगवेगळ्या पत्त्यावर आणि 21 नावांनिशी राहत असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंडच्या महसूल विभागाने आज ही माहिती उघड केली आहे. मोस्ट वाँटेड दहशतवादी म्हणून ७ नोव्हेंबर २००३ मध्ये दाऊदविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानंतर तो पाकिस्तानमध्येच वास्तव्यास असल्याते समोर आले.गेल्या वर्षी लंडनमधील महसूल विभागाने दाऊदची आर्थिक नाकेबंदी करताना त्याच्या लंडनमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंडकडून दाऊदला असेट्स फ्रीज लिस्टमध्ये टाकले आहे. यामध्ये दाऊदच्या पाकिस्तानमधील तीन पत्त्याचा आणि 21 नावांचा समावेश आहे. इंग्लंडच्या वित्त मंत्रालयाने सोमवारी 'फायनँशियल सेक्शन्स टार्गेट्स इन द यूके' या नावाने यादी जारी केली आहे. यामध्ये दाऊद इब्राहिम कासकर या नावाने खोली क्रमांक ३७, डिफेन्स रोड, हाऊसिंग अॅथॉरिटी, कराची, पाकिस्तान. तर दुसरा पत्ता खोली क्रमांक २९, मरगाला रोड, एफ ६-२ स्ट्रीट नंबर २२, कराची, पाकिस्तान. नूरबाद, पाकिस्तान, कराची, (त्याशिवाय पाकिस्तान पलातियाल बंगला, हिल परिसर) आणि व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, किल्फटन, कराची, पाकिस्तान. असे गोंधळवून टाकणारे पत्ते त्याने दिले आहेत.दाऊदचं राष्ट्रीयत्व भारतीय असून त्याचा पासपोर्ट भारताने रद्द केल्यानंतर त्याने भारतीय व पाकिस्तानी अनेक बनावट पासपोर्ट केले व त्याचा गैरवापर केला आहे, असेही यात म्हटले आहे. 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दाऊद मुख्य आरोपी आहे. 12 मार्च 1993 रोजी 13 ठाकाणी झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटात 257 जण ठार तर 713 जण जखमी झाले होते.
दाऊद इब्राहिम तीन पत्ते आणि 21 नावांनिशी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 10:22 PM