न्यूयॉर्क - व्हॅलेरिया ही अवघी दोन वर्षांची मुलगी खूपच चुणचुणीत होती. चेहऱ्यावर सतत हास्य, नाचायची आवड आणि आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. पण आपल्या देशात रोजगार नाही, तो मिळण्याची शक्यता नाही, हे लक्षात आल्यानं व्हॅलेरियाचे वडील आॅस्कर अल्बर्टो मार्टिन यांनी आपली मोटरसायकल विकली आणि त्यांनी पत्नी तानिया व मुलगी व्हॅलेरिया यांच्यासह एल सेल्वाडोर सोडून अमेरिकेत जायचं ठरवलं.अर्थातच अधिकृत प्रवेश मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे मिळेल त्या वाटेनं ते व पत्नी आपल्या मुलीला घेऊ न निघाले. मेक्सिकोमधील रियो ग्रँड नदी ओलांडली की ते अमेरिकेत प्रवेश करू शकले असते.नदी पार करताना मार्टिन यांनी मुलीला पाठीवर घेतलं. टी शर्टच्या आतमध्ये तिला सुरक्षित ठेवलं. पण त्यांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि ते आणि मुलगी नदीत बुडाले. पत्नी तानिया मात्र वाचली. मरण पावलेले बाप आणि मुलगी नदीच्या किनारी एकमेकांच्या शेजारी असल्याचं छायाचित्रं आता सर्वत्र प्रसारित झालं आहे. त्यात व्हॅलेरिया आपल्या वडिलांच्या टी शर्टच्या मागील बाजूला असल्याचं दिसत आहे. मृत्यूनंतरही मार्टिन यांनी मुलीला आपल्यापासून दूर केलं नाही.हे छायाचित्र प्रसारित होताच सेल्व्हाडोर व मेक्सिकोमध्ये अमेरिकेविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यांना अधिकृत प्रवेश मिळणं शक्य असतं, तर त्यांनी हा मार्ग अवलंबलाच नसता, अशा प्रतिक्रिया अमेरिकेतही व्यक्त होत आहेत. निर्वासितांना देशात येऊ च द्यायचं नाही, या ट्रम्प यांच्या धोरणामुळे हे घडलं, अशी अमेरिकन लोकांचीही भावना आहे. (वृत्तसंस्था)ट्रम्प काय म्हणाले?इतका संताप सर्व बाजूंनी व्यक्त झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केलं. असं छायाचित्र पाहणं आपल्यालाही आवडत नाही, असं त्यांनी म्हटलं. मार्टिन हा सर्वात चांगला बाप असणार, याची मला खात्री आहे, असंही ते म्हणाले आहेत.
मृत्यूनंतरही बाप-लेकीनं सोडली नाही एकमेकांची साथ, निर्वासित कुटुंबाची वाताहत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 4:56 AM