Coronavirus: कोरोनाने खाल्लं अमेरिकन लोकांचं आयुष्यमान; लोकांमध्ये प्रचंड प्रमाणावर मानसिक भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:01 AM2021-07-27T06:01:42+5:302021-07-27T06:02:01+5:30
कोरोनामुळे अमेरिकेत एकूण सहा लाखांपेक्षाही अधिक मृत्यू झाले. त्यातील तीन लाख ७५ हजार मृत्यू गेल्या वर्षी झाले आहेत.
कोरोनानं सगळ्या जगामध्ये अक्षरश: उत्पात घडविला. किती उद्योगधंदे बुडाले, किती कामगार देशोधडीला लागले, किती जीव हकनाक गेले, याची आकडेवारी अक्षरश: हादरविणारी आहे; पण आणखी एक गोष्ट कोरोनानं केली, ती म्हणजे चक्क लोकांचं आयुष्यमानही घटवलं. अमेरिका हा जगातला सर्वसंपन्न आणि विकसित देश मानला जातो; पण इथेही गेल्या दोन वर्षांत लोकांचं सरासरी आयुर्मान जवळपास दीड वर्षाने कमी झालं आहे. इतर विकसनशील आणि गरीब देशांमध्ये तर हे प्रमाण किती कमी झालं असेल याचा विचारच केलेला बरा.
अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’ या संस्थेच्या अहवालानुसार २०१९ मध्ये अमेरिकन लोकांचं सरासरी आयुर्मान ७८.८ वर्षे होतं, ते २०२० मध्ये ७७.३ वर्षे इतकं घसरलं. त्यातही पुरुष आणि महिला अशी सरासरी सांगायची तर पुरुषांचं आयुर्मान या वर्षभरातच एक वर्ष आठ महिन्यांनी घटलं, तर महिलांचं आयुर्मान एक वर्ष दोन महिन्यांनी घटलं. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेतील सरासरी आयुर्मान पहिल्यांदाच इतकं घटलं आहे. आयुर्मानातील सर्वाधिक घट लॅटिन अमेरिकन लोकांमध्ये, त्यानंतर कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांमध्ये दिसून आली आहे. श्वेत अमेरिकन लोकांचं आयुष्यमान मात्र या दोन्हींपेक्षा बरच चांगलं आहे.
कोरोनामुळे अमेरिकेत एकूण सहा लाखांपेक्षाही अधिक मृत्यू झाले. त्यातील तीन लाख ७५ हजार मृत्यू गेल्या वर्षी झाले आहेत. अमेरिकेतील लोकांचं आयुर्मान घटलं. त्याला ७५ टक्के कोरोना जबाबदार आहे. त्यानं लोकांमध्ये प्रचंड प्रमाणावर मानसिक भीती पसरविली. याशिवाय इतरही अनेक कारणांनी लोकांचं सरासरी आयुष्य घटलं. आरोग्य सुविधांचा अभाव, दीर्घ आणि किचकट आजारांसाठीच्या व्यवस्थापनातली कमतरता, ज्या ठिकाणी लोकांना आरोग्याचा आणि नैराश्याचा सर्वाधिक सामना करावा लागतोय, अशा ठिकाणी आरोग्य यंत्रणा कमजोर पडणं, गरजेच्या वेळी लोकांना अत्यावश्यक सेवा न मिळणं, लोकांसाठी ज्या सुविधा देण्यात आल्या होत्या, तिथपर्यंत लोक अथवा प्रशासन पोहोचू न शकणं, कोरोना महामारीमुळे जे अडथळे आले, त्याचं वेळीच निवारण करता न येणं. याशिवाय अपघात, औषधांचा ‘ओव्हरडोस’ इत्यादी अनेक कारणांमुळे अमेरिकन लोकांचं आयुर्मान घसरलं असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
कोरोनाचा जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर विपरीत परिणाम झाला; पण अमेरिकेच्या बाबतीत, कोरोनाची झळ सर्वाधिक बसली ती कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांना. श्वेत अमेरिकन आणि कृष्णवर्णीय अमेरिकन यांच्या आयुर्मानात अमेरिकेत कायम फरक राहिला आहे. श्वेत अमेरिकन लोकांना जास्त सोयी, सवलती, त्यांच्याकडे अधिक लक्ष असा विरोधाभास कायमच दिसून आला आहे. त्यावरून मानवाधिकार कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाजही उठविला आहे; पण आजवर त्यात फारसा फरक पडलेला नाही. एका पोलीस अधिकाऱ्यानं जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय तरुणाची दिवसाढवळ्या रस्त्यावर केलेली हत्या हे त्याचं केवळ एक उदाहरण आहे. अश्वेतांवर अन्याय, अत्याचाराचा इतिहास अमेरिकेत नवा नाही.
आधुनिक जीवनशैली आणि छानछोकीचं राहाणं यामुळे जडलेल्या व्याधींचं प्रमाणही अमेरिकेत कमी नाही. दिवसेंदिवस त्यात वाढच होते आहे. लोकांनी आपली लाइफस्टाइल बदलावी यासाठी सरकारही हरतऱ्हेनं प्रयत्न करतं आहे, पण त्यात अजून यश आलेलं नाही. मधुमेह, यकृताचे जुनाट विकार आणि हृदयविकाराच्या रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच आहे. तरुण आणि लहान मुलंही आता त्याला अपवाद राहिलेली नाहीत. याशिवाय आत्महत्या आणि खूनखराबा हा अमेरिकेपुढचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. सर्वसामान्य लोकांमध्येही हिंसाचाराचं प्रमाण चांगलंच मोठं आहे. हातात शस्त्र आहे आणि ‘मनाला वाटलं’ म्हणून समूहावर गोळीबार करण्याचे प्रकार अमेरिकेत सातत्यानं घडत असतात. याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावर होतो आहे. इतर विकसित आणि पुढारलेल्या देशांच्या तुलनेत अमेरिकेतील लोकांचं आयुर्मान कमी आहे, हे वास्तवही अमेरिकेला कायम कुरतडत आलं आहे. कोरोना महामारीचा दुष्परिणाम प्रत्येक नागरिकावर झाला असला, तरी वंश, गट, धर्म यानुसार त्याची झळ पोहोचलेल्यांचं प्रमाणही वेगवेगळं आहे. ही बाब अधिक चिंताजनक आहे.अमेरिकेसारख्या विकसित देशासाठी ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. अमेरिकेनं यात तातडीनं सुधार करावा अशी मानवाधिकार कार्यकर्त्यांची मागणी आहे.
‘कोण म्हणतं अमेरिका सर्वोत्तम?’
अमेरिकेतील लोकांच्या आयुर्मानातील घटीमुळे तेथील वांशिक भेदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्वेतवर्णीय अमेरिकनांचं प्राबल्य असलेल्या प्रिन्स्टन परिसरातील लोकांचं आयुर्मान अश्वेत आणि लॅटिन अमेरिकन लोकांची वस्ती असलेल्या ट्रेन्टन परिसरातील नागरिकांपेक्षा तब्बल १४ वर्षांनी अधिक आहे. ‘राहण्यासाठी अमेरिका हे जगातील सर्वोत्तम स्थान आहे’- या जागतिक समजालाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात तडे जात आहेत. अमेरिकेला याकडे वेळीच लक्ष द्यावे लागेल, अन्यथा त्यांच्या प्रतिमेवर गडद होत चाललेला हा डाग नंतर कधीच पुसता येणार नाही.