...डोकलाममधून मागे हटा, अन्यथा परिणाम भोगा, स्वराज यांच्या विधानानंतर चीनची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 11:55 AM2017-08-04T11:55:47+5:302017-08-04T11:56:45+5:30
भारत आणि चीन यांच्यातील डोकलाम नियंत्रण रेषेवरील वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय.
बीजिंग, दि. 4 - भारत आणि चीन यांच्यातील डोकलाम नियंत्रण रेषेवरील वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. संसदेत गुरुवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी डोकलाम सीमावादावर भारताची बाजू मांडली. त्यानंतर आज शुक्रवारील चीननं पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. चीन भारताला धमकी देत म्हणाला, जर भारतानं स्वतःच्या सैन्याला माघारी न बोलवलण्यास त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. भारतीय लष्करानं अवैधरीत्या डोकलाममध्ये नियंत्रण रेषा ओलांडली आहे, असं विधान चीनच्या वरिष्ठ राजनैतिक लियू जिनसोंग यांनी केलं आहे. तसेच काल सुषमा स्वराज यांनी चीन-भारत संबंधांवर स्पष्टीकरत देताना शेजारील देशांशी असलेल्या चांगल्या संबंधांची माहिती दिली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले, भारताला खरोखर चीनसोबत शांती प्रक्रिया अबाधित ठेवायत असल्यास त्यांनी तात्काळ सीमेवरून स्वतःचं सैन्य मागे बोलावलं पाहिजे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार चीन या मुद्द्यावर काहीचा मागे पडत आहे. तसेच चीनसोबतच्या राजनैतिक चर्चेवरसुद्धा सकारात्मक परिणाम मिळतोय. मात्र घाईघाईत चीनबाबत कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही. सध्याची स्थिती निवळण्यासाठी भारतानं डोकलाममधून बिनशर्त सैन्य मागे घेतलं पाहिजे. भारतानं 400हून अधिक सैनिक सीमेवर तैनात केले आहेत. त्यानंतर भारतानं सैनिकांना मागे बोलावलं आहे. आता डोकलाम सीमेवर फक्त 40 भारतीय सैनिक आहेत. भारतानं चीनच्या या आरोपांचं खंडन करत सीमेवर पूर्वीएवढंच सैन्य आहे, असंही म्हटलं आहे.
आपल्या निवेदनात चीनने म्हटले आहे की, भारताने भूतानमधील डोकाला पोस्टजवळ चीनकडून सुरु असलेल्या रत्याचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी 40 भारतीय लष्कराने एका बुलडोझरच्या मदतीने चीनच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे काम थांबवले होते. याची माहिती देताना चीनने दोन छायाचित्रेही यासोबत जोडली आहेत. त्याचबरोबर भारताच्या बाजूचे सैन्य डोकलामधून हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, यावर अद्याप भारताकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, डोकलाम प्रकरणी भारताकडून 30 जूनला स्पष्टीकरण दिल्यानंतर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
काय आहे डोकलाम प्रकरण-
डोकलाम हे ठिकाण चीन, भारत आणि भूतान यांच्या त्रिकोणावर स्थित आहे. तिन्ही देशांसाठी रणनीतीच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण भूभाग आहे. भारत व चीन यांच्या सीमा ज्या डोकलाम क्षेत्रात एकत्र येतात तेथे भारतीय सेना चीनच्या सैन्यासमोर गेल्या दीड महिन्यांपासून उभी आहे. भारतीय लष्करानं चीनचे त्या क्षेत्रातील बांधकाम रोखलं आहे. चीनच्या मते तो भूभाग स्वतःच्या मालकीचा असल्यामुळे त्यात रस्ते व अन्य बांधकाम करण्याचा अधिकार आहे. भारताचा आक्षेप या प्रदेशाच्या मालकीबाबतचा जसा आहे तसाच तो चिनी बांधकाम भारताच्या उत्तर सीमेवर एक लष्करी आव्हान उभे करील, असाही आहे. सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे. चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं. त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, तेव्हापासून दोन्ही देशातील सैन्यामध्ये तणाव वाढत आहे.