इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७0 कलम भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्याची घोषणा केली आहे. सोमवारपासून ही बससेवा स्थगित केली जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.फेब्रुवारी १९९९ मध्ये ही बससेवा सुरू करण्यात आली होती. २00१ मध्ये भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर ही बससेवा निलंबित करण्यात आली होती. २00३ मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानचे संपर्क व डाक सेवामंत्री मुराद सईद यांनी सांगितले की, ‘राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बुधवारच्या बैठकीतील निर्णयाला सुसंगत निर्णय घेऊन लाहोर-दिल्ली बससेवा निलंबित करण्यात येत आहे.’ पाकिस्तानच्या संपर्क मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार असल्याचे म्हटले आहे.दिल्ली गेट येथील आंबेडकर स्टेडियम टर्मिनलवरून लाहोर-दिल्ली बस चालविली जाते. दिल्ली परिवहन मंडळाच्या (डीटीसी) बसगाड्या दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या बसगाड्या मंगळवार, गुरुवार व शनिवारी दिल्लीहून लाहोरला रवाना होतात.दरम्यान, पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत तसेच संसदेच्या संयुक्त अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भारतासोबतचे व्यापारी संबंध संपविण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक ‘डॉन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.पुलवामा अतिरेकी हल्ल्यापासून दोन्ही देशातील संबंध आधीच ताणले गेले आहेत. भारताने पाकिस्तानातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर २00 टक्के आयात शुल्क लादले आहे. (वृत्तसंस्था)१६५ प्रवाशांसह पाकला दाखल झाली एक्स्प्रेसकराचीला जाणा-या थड एक्स्प्रेसने शनिवारी शेवटचा प्रवास केला. १६५ प्रवासी असलेल्या या रेल्वेला पुढील प्रवासासाठी पाकिस्तानकडून परवाना मिळाला. ३७0 कलम रद्द केल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व रेल्वे सेवा संपुष्टात आणल्या आहेत. जोधपूर-कराची ही दोन्ही देशातील शेवटची रेल्वे असेल, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय सीमेवरील शून्य बिंदूवर (झीरो पॉइंट) पोहोचल्यानंतर प्रवासी दुसºया रेल्वेत बसतील. ४१ वर्षांच्या खंडानंतर १८ फेब्रुवारी २00६ रोजी जोधपूर-कराची या दरम्यान थर एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. पाकिस्तानकडूनही शनिवारी थड एक्स्प्रेस भारतात दाखल झाली. या रेल्वेची ही अखेरची फेरी होती.
पाकिस्तानकडून दिल्ली-लाहोर बस बंद, व्यापारी संबंधही संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 4:39 AM