युनियन कार्बाईडवर खटल्यास नकार
By admin | Published: August 2, 2014 03:39 AM2014-08-02T03:39:03+5:302014-08-02T03:39:03+5:30
भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य दोषी असलेल्या युनियन कार्बाईड कॉर्पोरेशनवर येथील रासायनिक कारखान्यातून पसरलेल्या प्रदूषणासाठी खटला चालवला जाऊ शकत नसल्याचा निकाल दिला आहे.
न्यूयॉर्क : भोपाळ गॅस दुर्घटनेतील मुख्य दोषी असलेल्या युनियन कार्बाईड कॉर्पोरेशनवर येथील रासायनिक कारखान्यातून पसरलेल्या प्रदूषणासाठी खटला चालवला जाऊ शकत नसल्याचा निकाल दिला आहे. अमेरिकी न्यायालयाचा हा निकाल १९८४ साली घडलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
स्वयंसेवी संस्था अर्थराईट्स इंटरनॅशनलने भोपाळ पीडितांमार्फत न्यूयॉर्कच्या जिल्हा न्यायालयात एक याचिका केली होती. यात नागरिकांची जमीन आणि पाणी कारखान्यातून पसरलेल्या प्रदूषणामुळे वापरण्यायोग्य नसल्याचा दावा करण्यात आला होता. संघटनेच्या मते, कारखान्याच्या उभारणीचे काम कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या हातात होते, हा पुरावा दिल्यानंतरही न्यायालयाने कार्बाईडविरोधात खटला चालवला जाऊ शकत नसल्याचा निकाल
दिला.
जिल्हा न्यायालयाने दिलेला हा त्रुटीपूर्ण निर्णय ठोस पुराव्यामुळे अपिलात बदलेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला. याचिकेत मध्यप्रदेश सरकारलाही प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारकडे कारखाना स्थळाच्या साफ-सफाईत मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश जॉन केनान यांनी दिलेल्या ४५ पानी निकालात मध्यप्रदेश सरकारला घटनास्थळाच्या स्वच्छतेसाठी संपूर्ण साहाय्य करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी अमेरिकी युनियन कार्बाईड कंपनीविरोधात खटला चालवण्यास नकार दिला आहे. (वृत्तसंस्था)