इस्रायलकडून राखीव सैनिक तैनात
By admin | Published: August 1, 2014 12:01 AM2014-08-01T00:01:12+5:302014-08-01T00:01:12+5:30
गाझापट्टीवरील आपल्या मोहिमेला गती देत इस्रायलने आणखी १६ हजार राखीव सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाझा/जेरूसलेम : गाझापट्टीवरील आपल्या मोहिमेला गती देत इस्रायलने आणखी १६ हजार राखीव सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हमासच्या अतिरेक्यांविरोधात गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या सैन्य अभियानाला आणखी गती देण्याच्या उद्देशाने इस्रायलने हा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत गाझातील १,३६० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले.
जागतिक पातळीवरून केले जाणारे संयम राखण्याचे आवाहन धुडकावून लावत इस्रायली सुरक्षा कॅबिनेटने ‘आॅपरेशन प्रोटेक्टिव एज’ कायम ठेवण्यास मंजुरी दिली. गेल्या ८ जुलैपासून हे अभियान सुरू आहे.
नवीन सैन्यबल तैनातीमुळे या संघर्षात सहभागी इस्रायली सैनिकांची संख्या वाढून ८६ हजारावर गेली आहे. या संघर्षात जवळपास ५८ इस्रायली मारले गेले. यात ५६ सैनिक व दोन नागरिकांचा समावेश आहे. इस्रायलमध्ये काम करत असलेला थायलंडचा एक मजूरही यात मारला गेला.
गाझापट्टीवरून हमास बंडखोरांतर्फे सुरू रॉकेट हल्ले रोखण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचा दावा इस्रायलद्वारे केला जात आहे; मात्र नंतर हमासचे इस्रायलमध्ये प्रवेश करण्यासाठी बोगदे नष्ट करण्यासाठी ही कारवाई सुरू ठेवण्यात आल्याचे इस्रायलद्वारे सांगण्यात आले.
अभियान कायम ठेवतानाच इस्रायलने इजिप्तला एक शिष्टमंडळ पाठविले आहे. अमेरिकेशी हातमिळवणी करत इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षावर तोडगा काढण्याचा प्रयत्न इजिप्त करत आहे; मात्र यास अद्याप यश आले नाही.
(वृत्तसंस्था)
एका इस्रायली वृत्तसंकेतस्थळाने वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, अभियान पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ देण्याची गरज आहे. याकरता राखीव सैन्यबल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. राखीव सैन्य कुठे आणि कशा पद्धतीने तैनात करावे, याबाबत गुरुवारी निर्णय घेतला जाईल. दरम्यान, इस्रायली सैन्याच्या हल्ल्यातील जीवितहानीमध्ये वाढ होत आहे. बुधवारी एका हल्ल्यात तीन सैनिक मारले गेले.
दरम्यान, इस्रायलने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या गाझातील शाळेवरील हल्ल्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. या हल्ल्यात कमीत कमी १६ जण मृत्युमुखी पडले होते. नि:शस्त्र नागरिकांना लक्ष्य केल्याने जागतिक पातळीवरून इस्रायलवर तीव्र टीका केली जात आहे. इस्रायलने चुकीने हा हल्ला झाल्याचा दावा करत याबद्दल माफी मागितली आहे. तिकडे संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव बान की मून यांनी शाळेवरील हल्ला ‘अयोग्य’ असल्याचे संबोधत याचा निषेध केला.