लिबियामध्ये आलेल्या पुरानंतर तेथील परिस्थिती अत्यंत भयावह बनत चालली आहे. पुराचा सर्वाधिक फटका डेर्ना शहराला बसला असून धरण फुटल्याने शहराचा सुमारे एक चतुर्थांश भाग वाहून गेला आहे. बुधवारपर्यंत बचाव कर्मचाऱ्यांनी डेर्ना शहरात ५३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर प्रादेशिक प्रशासनाच्या एका मंत्र्याने सांगितले की मृतांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.
शहरातील ३०,००० लोक बेघर झाले आहेत. डेर्ना व्यतिरिक्त, बेनगाझीसह इतर वादळग्रस्त भागातील ६०८५ लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. आयओएमने बाधित भागात औषधे, शोध आणि बचाव उपकरणांसह कर्मचारी पाठवले आहेत. नुकसान इतके व्यापक आहे की मानवतावादी मदत कर्मचाऱ्यांसाठी डेर्ना दुर्गम बनले आहे, असे संस्थेने म्हटले आहे. पूर्व लिबियाचे आरोग्य मंत्री ओथमान अब्दुलजलील यांनी सांगितले की, डेर्ना येथील सामूहिक कबरीत मृतदेह पुरले जात आहेत. काही मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले.
बचाव कार्यात सहभागी असलेले अहमद अब्दुल्ला म्हणाले की, ते मृतदेह स्मशानभूमीत सामूहिक कबरीत दफन करण्यासाठी नेण्यापूर्वी रुग्णालयात ठेवत होते. परिस्थिती अवर्णनीय आहे. या आपत्तीत संपूर्ण कुटुंबांचा मृत्यू झाला, काही लोक समुद्रात वाहून गेले. शहरातील बुलडोझरही मृतदेह बाहेर काढू शकत नाहीत. बॉडी बॅग आणि ब्लँकेटमध्ये झाकलेले मृतदेह शहरातील एकमेव स्मशानभूमीत एकत्र पुरले जात आहेत. येथे मशिनच्या साह्याने खड्डे खोदण्यात आले आहेत. येथे दर तासाला मृतदेहांची संख्या वाढत आहे.
बहुमजली इमारती चिखलात कोसळल्या
डेर्ना शहराच्या मध्यभागी डोंगरातून वाहणाऱ्या वाडी-डेर्ना नदीचे बंधारे तुटल्याने संपूर्ण निवासी बांधकामे उद्ध्वस्त झाली आहेत. नदीपासून लांबून एकेकाळी उंच उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारती चिखलात कोसळल्या. तसेच सर्वत्र मृतदेह असल्याचे दिसून येत होते.