वॉशिंग्टन : अमेरिकेतील उवाल्डे शहरातील शाळेत एका माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २१ जण ठार झाल्याच्या घटनेनंतर बंदुकांच्या वापरांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी त्या देशात पुन्हा जोर धरू लागली आहे. मात्र बंदुकांच्या वापरावर नियंत्रणे घालण्याबाबत अमेरिकेतील विविध राज्यांतच तीव्र मतभेद असून, नजीकच्या काळात या प्रश्नावर तोडगा निघणे कठीण आहे.वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे इन्सली यांनी त्या राज्यात बंदुकांच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सोशल मीडियावर झळकवली आहे. आता अशा पद्धतीचे निर्णय अमेरिकी काँग्रेसनेही घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही राज्यांमध्ये बंदुकांच्या वापर वाढेल अशा पद्धतीचीच धोरणे आहेत.
बंदूक संस्कृतीला विरोध न करणाऱ्या राज्यांपैकी बहुतांश ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची सत्ता आहे. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क येथे बंदूक वापरावर नियंत्रणासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत. पेनसिल्वानिया येथे अत्याधुनिक, स्वयंचलित बंदुका, रायफली बाळगण्यास बंदी करावी, अशी डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी फेटाळून लावली.
हल्ल्यामागे कारस्थान असल्याची चर्चाउवाल्डेमधील शाळेत झालेल्या गोळीबारामागे मोठे कारस्थान, वर्णद्वेषी भूमिका असल्याचीही चर्चा अमेरिकेत सोशल मीडियामध्ये होऊ लागली आहे. त्या शाळेत गोळीबार करणारा माथेफिरू स्थलांतरित तसेच ट्रान्सजेंडर होता, असेही दावे अनेक लोकांनी केले आहेत.
बंदुकांबाबतचे कायदे कडक करा : पी. चिदंबरमबंदूकांची खरेदी व ती अग्निशस्त्रे बाळगणे याबाबतच्या भारतातील कायदेही अधिक कडक केले पाहिजेत अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. उवाल्डे घटनेपासून धडा घेऊन बंदूक वापराबद्दलचे कायदे अधिक कडक करणे हाच उत्तम पर्याय आहे असेही ते म्हणाले.