ओसाका - जपानच्या ओसाकामध्ये जी 20 शिखर संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या संमेलनात पर्यावरणाच्या मुद्द्यावर विविध देशातील नेत्यांची बैठक होणार आहे. 2050 पर्यंत जगातील समुद्रामध्ये असणारा प्लास्टिकचा कचरा संपविण्याबाबत या बैठकीत एकमत होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी जलवायू परिवर्तनावर चर्चा होणार आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील अन्य मोठ्या नेत्यांसोबत चर्चेत सहभागी होतील.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचं अभिनंदन केलं. तर मोदींनी या भेटीत चार मुद्द्यांचा उल्लेख केला. यानंतर या दोन्ही नेत्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी चर्चा केली.
तसेच भारत लोकशाही आणि शांततेसाठी कटिबद्ध असल्याचं मोदी यांनी सांगितले. 'सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत,' असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं. तर गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारल्याचं ट्रम्प म्हणाले. भारत आणि अमेरिकेची मैत्री नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून मोदी माझे चांगले मित्र असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं.