बीजिंग: डोकलाम वाद अतिरंजक स्वरूपात समोर आणला जात असून, चीनसोबतच्या संवदेनशील मुद्यांवर यथास्थिती कायम राहावी, असे भारताचे चीनमधील राजदूत गौतम बम्बावाले यांनी स्पष्ट केले आहे.ग्लोबल टाइम्स या चिनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, चीन-पाकिस्तान कॉरिडॉरसंबंधी(सीपीईसी)वादासह संघर्षाच्या संपूर्ण मुद्यावर चर्चा व्हायला हवी. ५० अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून हा कॉरिडॉर उभारला जात आहे. डोकलाम वादामुळे दोन देशांचे संबंध बिघडले काय? या प्रश्नावर त्यांनी हा वाद अवास्तव पद्धतीने समोर आणला जात असल्याकडे लक्ष वेधले. द्विपक्षीय संबंध पाहता छोट्या वादांवर मात करण्यासाठी दोन्ही देशातील जनता आणि नेत्यांकडे मोठा अनुभव आणि समजदारी आहे, असे ते म्हणाले. डोकलाममधील घटनेनंतर भारत आणि चीनने नेतृत्वाच्या स्तरावर चर्चा करण्याची गरज आहे. डोकलामजवळ मार्ग तयार करण्यासाठी चीनने प्रयत्न चालविले असल्याच्या वृत्तावर त्यांनी थेट प्रतिक्रिया टाळली.महत्त्वाच्या संवदेनशील मुद्यांवर स्थिती कायम राहिली जावी, असेही त्यांनी सुचविले. डोकलाम वादात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांचा संबंध असून, दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. दोन देशांमध्ये युद्धाची स्थिती उभी ठाकल्यानंतर चीनने माघार घेत सैन्य परत पाठविले होते.
डोकलाम वादाला अवास्तव महत्त्व, चर्चेची गरज - भारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 4:02 AM