एच १बी व्हिसा, ग्रीनकार्डवरील बंदीला ट्रम्प यांनी दिली मुदतवाढ; भारतीयांना आणखी एक दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:09 AM2021-01-02T01:09:23+5:302021-01-02T07:05:12+5:30
नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अधिकारावर आल्यानंतर यामध्ये काही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वॉशिंग्टन : भारतामधील आयटी तंत्रज्ञांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला एच१बी व्हिसा आणि ग्रीनकार्ड यावरील बंदी ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी करून भारतीयांना जाता जाता आणखी एक दणका दिला आहे.
नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अधिकारावर आल्यानंतर यामध्ये काही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गतवर्षी अमेरिकेमध्ये झालेल्या कोरोनाच्या उद्रेकापासून अमेरिकनांना वाचविण्यासाठी एच१बी व्हिसा आणि ग्रीनकार्डवर प्रतिबंध लावण्यात आले होते. अद्यापही अमेरिकेमध्ये कोरोनाचे संक्रमण सुरूच असून, परिस्थितीमध्ये फारसा बदल न झाल्यामुळे हे प्रतिबंध येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बदल होण्याची अपेक्षा
राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आलेले जो बायडेन यांचा या धोरणाला विरोध असून, ते अधिकारावर आल्यानंतर यामध्ये काही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमेरिकेमध्ये नोकरीला जाणाऱ्या मुख्यत: आयटीमधील व्यक्तींसाठी एच१बी व्हिसा महत्त्वाचा असून, त्याच्यावरच बंदी आल्याने माहिती तंत्रज्ञान कंपन्या अडचणीमध्ये सापडल्या आहेत.