अमेरिकेतल्या फर्स्ट लेडीवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन बायकांमध्ये खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 03:32 PM2017-10-10T15:32:06+5:302017-10-10T15:33:42+5:30
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी काही सुटण्याचं नाव घेत नाहीयेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोन ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असतानाच आता ट्रम्प हे गृहक्लेशामुळे हैराण झालेत.
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी काही सुटण्याचं नाव घेत नाहीयेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोन ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असतानाच आता ट्रम्प हे गृहक्लेशामुळे हैराण झालेत. अमेरिकेची 'फर्स्ट लेडी' बनण्यासाठी ट्रम्प यांच्या दोन्ही बायकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प या संपूर्ण जगभरात अमेरिकेची 'फर्स्ट लेडी' म्हणून परिचित आहेत. परंतु या वादाला आता नवी फोडणी मिळाली आहे.
ट्रम्प यांची पहिली बायको इवाना यांनी फर्स्ट लेडी या पदावर दावा केला आहे. 'रेजिंग ट्रम्प' या त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी त्या एका टेलिव्हिजन शोमध्ये आल्या होत्या. त्या म्हणाल्या, माझ्याकडे व्हाइट हाऊसचा नंबर असूनही, मी तिकडे फोन करू शकत नाही. कारण तिथे ट्रम्प यांची दुसरी बायको मेलानिया आहे. माझ्या फोनमुळं मेलानियाला असुरक्षितता वाटू नये, असं मला वाटतं. कारण तसंही ट्रम्प यांची मीच पहिली पत्नी आहे, असं त्या गमतीशीरपणे म्हणाल्या.
मात्र इवानाची ही मस्करी मेलानिया यांच्या चांगली जिव्हारी लागली आहे. मेलानिया यांना अमेरिकेची 'फर्स्ट लेडी' होण्याचा दर्जा मिळाला असून, ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. फक्त लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठीच त्यांनी असे विधान केले आहे, असं मेलानियाच्या प्रवक्त्या स्टेफनी ग्रिशम म्हणाल्यात.
दरम्यान, इवानाने तिच्या या पुस्तकात ट्रम्प यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 68 वर्षीय इवाना ट्रम्प या व्यवसायाने उद्योजिका व मॉडेल आहेत. 1977मध्ये त्यांनी ट्रम्प यांच्याशी विवाह केला. परंतु 1992मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. 'रेजिंग ट्रम्प' या त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आल्या असता त्या म्हणाल्या, ट्रम्प आणि मी ब-याचदा संपर्कात असतो. दोन आठवड्यानंतर आम्ही एकमेकांना आवर्जून फोन करतो, असं इवानानं या पुस्तकात लिहिलं आहे. ट्रम्प यांच्याकडून काडीमोड घेण्यासाठी इवाना यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.