वाशिंग्टन - कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे जगभरातील लोक एकमेकांचे अभिवादन करण्यासाठी आता भारतीय संस्कृतीचा अवलंब करत आहेत. ते एकमेकांचे स्वागत आता हात जोडून नमस्कार करत करू लागले आहेत. यात सामान्य नागरिकांचा तर समावेश आहेच, पण अनेक देशांचे प्रमुख नेतेही आता एकमेकांचे अभिवादन करण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाइट हाउस येथे आयरलंडचे पंतप्रधान लियो वराडकर यांचे स्वागत नमस्कार करूनच केले. लियो वराडकर हे मुळचे भारतीय वंशाचे आहेत.
ट्रम्प आणि लिओ वराडकर यांना भेटीनंतर पत्रकारांनी जेव्हा विचारले, की आपम एकमेकांचे अभिवादन कसे केले. त्यावर या दोन्हीही नेत्यांनी हात जोडून नमस्कार करून दाखवला. यावेळी, 'आज आम्ही हस्तांदोलन केले नाही. आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि आता काय करायचे, असे एकमेकांना विचारले. हे थोडे विचित्र होते,' असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्याकडून भारतीय संस्कृतीचे कौतुक –ट्रम्प दुसऱ्यांदा नमस्कार करून पत्रकारांना म्हणाले, 'मी नुकताच भारत दौऱ्यावरून आलो आहे. मी तेथे कुणासोबतही हस्तांदोलन केले नाही आणि हे फार सोपे होते. कारण ती त्यांची संस्कृती आहे.' यावेळी ट्रम्प यांनी जपानी संस्कृतीचेही कौतुक केले. भारत आणि जपानमधील संस्कृती काळाच्या पुढीची आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी अवर्जून सांगितले.
'मला हस्तांदोलन करायला फारसे आवडत नाही. मात्र, एकदा तुम्ही राजकारणी झालात की, हस्तांदोलन नित्याचेच होते. असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.