वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन जिंकल्यास त्या निकालाला विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात आव्हान देण्याचीही शक्यता आहे. अशा धक्कादायक घटना तीन नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीनंतर घडू शकतात, असे राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.
ज्यो बायडन हे ट्रम्प यांचा पराभव करतील, असा निष्कर्ष काही जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी स्थिती उद्भवल्यास डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात गेले तर अमेरिकी लोकशाहीच्या दृष्टीने ते आक्रितच घडेल. अमेरिकेत कोरोना साथीने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलावी यासाठी सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले होते. कोरोना साथीला फार महत्त्व न देणाऱ्या तसेच विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाºया डोनाल्ड ट्रम्प यांनाच जेव्हा त्या संसर्गाची बाधा झाली त्यावेळी रिपब्लिकन पक्ष हादरला होता. राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानाचा दिवस अगदी तोंडावर आलेला असताना ट्रम्प यांची प्रचार मोहीम थंडावणे त्या पक्षाला मानवणारे नव्हते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनीही रुग्णालयात काही दिवसच राहून पुन्हा प्रचार मोहिमेत उडी घेतली. ज्यो बायडन यांची जिंकण्याची शक्यता ट्रम्प यांच्यापेक्षा १७ टक्क्यांनी अधिक आहे, असा निष्कर्ष ओपियम रिसर्च व गार्डियनने केलेल्या जनमत चाचणीतून काढण्यात आला होता.मास्क काढून समर्थकांच्या दिशेने भिरकावले - अमेरिकेतील एका प्रचार सभेत डोनाल्ड ट्रम्प यांनी तोंडाला लावलेला मास्क काढून आपल्या समर्थकांच्या दिशेने भिरकावले. कोरोना साथीचे आपल्या मनात भय नाही, असे ट्रम्प यांना सूचित करायचे होते, असे त्यांच्या पाठीराख्यांनी सांगितले. मात्र, ट्रम्प यांच्या या कृतीवर अमेरिकेत टीकेची झोड उठविण्यात आली आहे.