डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात; अध्यक्षीय निवडणुकीतील गैरव्यवहार प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:17 AM2023-08-16T09:17:18+5:302023-08-16T09:18:00+5:30
ट्रम्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान २०२० मध्ये जॉर्जिया राज्यातील निकाल फिरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे ट्रम्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.
२०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव होत असल्याचे लक्षात येताच जॉर्जियासह विविध राज्यांतील निकाल फिरविण्याचा प्रयत्न केला होता. ट्रम्प यांच्या या प्रयत्नांना तेथील न्यायव्यवस्थेने जोरदार आक्षेप घेतला. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याविरोधात जॉर्जिया राज्यातील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्यावर आरोप निश्चिती करण्यास परवानगी दिली. अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांत हस्तक्षेप करण्याचे आरोप ट्रम्प आणि त्यांच्या १८ साथीदारांवर आहेत. अमेरिकेत वेगवेगळ्या राज्यांत ट्रम्प यांच्याविरोधात अशा याचिका दाखल असून चौथ्यांदा ट्रम्प यांच्यावर हा असा आरोप निश्चित होत आहे.
‘रिपब्लिकन’ला प्रश्न
२०२४ मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून ७७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ट्रम्पही हिरिरीने त्यासाठी वातावरणनिर्मिती करत आहेत. मात्र, आता जॉर्जियातील न्यायालयाच्या निकालामुळे या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराचे तसेच निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप असलेल्या ट्रम्प यांना उमेदवारी कशी द्यायची, हा प्रश्न रिपब्लिकन पक्षासमोर उभा राहिला आहे.