वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनावरील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच "माझी तब्येत आता उत्तम आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना व्हायरसला तुमच्या जीवनावर वरचढ होऊ देऊ नका" असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प अद्यापही कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना आता व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार ट्रम्प हे संध्याकाळी 6 वाजता वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधून पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. पण ट्रम्प अद्यापही कोरोनातून पूर्णपणे बरे झाले नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र तब्येतीत काही सुधारणांमुळे त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
"कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाही"
"माझी तब्येत आता उत्तम आहे. कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाही. कोरोनाला तुमच्या जीवनावर वरचढ होऊ देऊ नका. आम्ही आमच्या कार्यकाळादरम्यान काही चांगली औषधं आणि माहिती विकसित केली आहे. मला 20 वर्षांपूर्वी जसं वाटायचं त्यापेक्षाही उत्तम आता वाटत आहे" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांची ऑक्सिजन पातळीही सामान्य आहे. त्यांना रेमडेसिवीरचा पाचवा डोस हा व्हाईट हाऊसमध्ये दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोनावर उपचार सुरू असताना रविवारी ट्रम्प काहीकाळ रुग्णालयामधून बाहेर गेले. बाहेर जाताना डोनाल्ड ट्रम्प यांनी रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या समर्थकांना अभिवादन केले. दरम्यान, कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैद्यकीय समुदायाने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी बाहेर पडताना मास्क लावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या बुलेटप्रूफ कारमधून रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या समर्थकांना अभिवादन केले. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि साथीच्या आजारांवर चुकीची माहिती पसरवण्याबद्दल अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयाबाहेर; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तज्ज्ञांची टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याच सरकारने सार्वजनिक आरोग्यासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे, अशी तक्रार तज्ज्ञांनी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान आयसोलेशनमध्ये राहण्याची गरज आहे. तसेच, त्यांनी सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांच्या जीवालाही धोका पोहचविण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या आरोग्य तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या 'स्टंट'वर टीका केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या अनिवार्य प्रवासामुळे कारमधील प्रत्येक व्यक्तीला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करणे आवश्यक आहे, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या आपत्ती औषध विभागाचे प्रमुख जेम्स फिलिप्स म्हणाले. तसेच, त्यांच्यासोबत असलेले व्यक्ती आजारी पडू शकतील. कदाचित त्यांचा मृत्यू होऊ शकेल. राजकीय फायद्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं जीवन धोक्यात घातलं. हा वेडेपणा आहे, असंही जेम्स फिलिप्स यांनी सांगितलं.