कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार उडालेले असताना या महामारीमागे चीनचा हात असल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून केला गेला आहे. अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी देखील याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. नुकतंच भारतीय वैज्ञानिक दाम्पत्य डॉ. राहुल बाहुलिकर आणि डॉ. मोनाली यांनी कोरोना व्हायरसचा निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेतूनच झाल्याचा दावा केला होता. पण चीनकडून सर्व आरोप वारंवार फेटाळण्यात येत आहेत. त्यात आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधताना नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी देखील कोरोना व्हायरसच्या प्रसारामागे चीनचा हात असल्याचं विधान केलं होतं. ट्रम्प यांनी आता अमेरिका आणि इतर देशांनी कोरोनामुळे झालेल्या नुकसानापोटी चीनकडे भरपाईची मागणी करायला हवी, अशी मागणी केली आहे. उत्तर कॅरोलिया येथे रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
"कोरोनामुळे झालेली नुकसान भरपाई चीनकडून मागण्याची वेळ आता आली आहे. या व्हायरससाठी चीनचं कम्युनिस्ट सरकार कारणीभूत आहे. अमेरिकेसह इतर सर्व देशांनी चीनकडे नुकसान भरपाईची मागणी करावी", असं ट्रम्प म्हणाले. यासोबतच अमेरिकेनं आता चीनी वस्तूंवर १०० टक्के कर लावायला हवा. यामुळे चीनच्या विकासाला खीळ बसेल आणि अनेक कंपन्या अमेरिकेत येऊ पाहतील. पण सद्याचं सरकार चीनपुढे झुकलं आहे, असा घणाघात ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यावर केला आहे.