इस्रायलला ‘मर्यादे’चे डोस, मानवतेचाही विचार करा; अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह ५ देशांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 05:19 AM2023-10-24T05:19:09+5:302023-10-24T05:21:20+5:30

मानवतावादी हेतूंसाठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे इस्रायलने पालन करावे व नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे नमूद केले आहे.

dose of limits to israel consider humanity too notice of 5 countries including america uk france | इस्रायलला ‘मर्यादे’चे डोस, मानवतेचाही विचार करा; अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह ५ देशांची सूचना

इस्रायलला ‘मर्यादे’चे डोस, मानवतेचाही विचार करा; अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह ५ देशांची सूचना

वॉशिंग्टन : इस्रायलला हमास या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करण्याचा व स्वसंरक्षणाचा हक्क आहे, मात्र त्यांनी मानवतेसंदर्भातील आंतरराष्ट्रीय कायदा आणि मर्यादा न ओलांडता नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी सूचना अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली या देशांनी इस्रायलला केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी इस्रायलच्या मुद्द्याबाबत चर्चा केली. त्यानंतर व्हाइट हाऊसतर्फे एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. त्यात दहशतवादापासून स्वत:चे रक्षण करण्याचा इस्रायलचा हक्क अबाधित आहे. मात्र मानवतावादी हेतूंसाठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे इस्रायलने पालन करावे व नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे नमूद केले आहे.

सर्व ओलिसांची सुटका करावी

हमासने गेल्या ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हल्ले केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही गाझा भागावर प्रतिहल्ले केले. ओलीस ठेवलेल्यांपैकी दोन अमेरिकी महिलांची हमासने सुटका केली. त्यांनी ओलीस ठेवलेल्या सर्व नागरिकांचीही सुटका करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

गाझावर दिवस-रात्र हवाई हल्ले

गाझामध्ये जगभरातून मदतीचा ओघ सुरू असताना इस्रायलची लढाऊ विमाने मात्र शहरावर दिवस-रात्र हल्ले करत आहेत. इस्रायलकडून सीरिया, लेबनॉन, वेस्ट बँकेतील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. हिजबुल्लाहने युद्ध सुरू केल्यास ती त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करेल. युद्धाचे परिणाम हिजबुल्ला आणि लेबनॉनसाठी विनाशकारी असतील,’ असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले.

हमासकडून रासायनिक शस्त्रांचा वापर : इस्रायल

रॉकेट आणि हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून सुरू झालेले इस्रायल-हमास युद्ध आता रासायनिक शस्त्रांच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. ७ ऑक्टोबरला म्युझिक फेस्टिव्हलवर हल्ला केलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना रासायनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्याचे निर्देश दिले होते, असा दावा इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हेर्जोग यांनी केला आहे. फेस्टिव्हलमध्ये हत्याकांड घडवणारे काही दहशतवादी ठार झाले. त्यांच्या मृतदेहाच्या पडताळणीत रासायनिक शस्त्रास्त्रे बनवण्याचे साहित्य आढळले. त्यात सायनाइडचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जे साहित्य दहशतवाद्यांकडे सापडले आहे, त्याचे संबंध ‘अल कायदा’शी असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी कागदपत्रेही दाखविली.

 

Web Title: dose of limits to israel consider humanity too notice of 5 countries including america uk france

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.