बीजिंग : चीनच्या चँग-फोर मोहिमेने चंद्राचे आच्छादन रसायन आणि खनिजापासून कसे बनले आहे, यावर प्रकाश टाकला असल्यामुळे पृथ्वी आणि त्याचा नैसर्गिक उपग्रह चंद्र यांची उत्क्रांती/विकास कसा झाला, याचे गूढ उकलण्यात मदत होईल.चंद्राची जी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही किंबहुना तिच्यावर प्रकाश खूप कमी असतो (डार्क साईड म्हणूनही ती ओळखली जाते), अशा भागावर प्रथमच अगदी सहजपणे यावर्षी जानेवारी महिन्यात उतरण्याचा मान चँग-फोर यानाने मिळवला आहे.रोव्हर युटू-२ ने सभोवताल शोधण्यासाठी लँडरला मोकळे सोडले. युटू-२ मध्ये बसविलेल्या दृश्य आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटरने मिळवलेल्या माहितीचा वापर करून ली चुन्लाई यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल आॅब्झरर्व्हेटोरीज आॅफ चायनाच्या संशोधक तुकडीला जेथे चँग-फोर यान उतरले त्या भागातील चंद्राची जमीन आॅलिवाईनआणि पायरोक्सिन असलेली आढळली. हे घटक चंद्राच्या खूप खोलवरील आच्छादनातून आलेले होते. चँग-फोरने जो पहिला महत्त्वाचा वैज्ञानिक शोध घेतला तो ‘जर्नल नेचर’च्या ताज्या आॅनलाईन अंकात प्रसिद्ध झाला आहे. (वृत्तसंस्था)
कशी आहे चंद्राची रचना?पृथ्वीची रचना जशी आहे तशी कोअर, मँटल आणि क्रस्ट अशी चंद्राचीही आहे. चंद्राचा कठीण पापुद्रा हा फारच जाड असल्यामुळे आणि चंद्रावर अब्जावधी वर्षांत ज्वालामुखीच्या घडामोडी आणि प्लेटची हालचाल न झाल्यामुळे चंद्राच्या आच्छादनातून पृष्ठभागावर पदार्थ सापडणे कठीण आहे, असे ली यांनी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआला सांगितले. पृथ्वीपासून चंद्राची जी बाजू दिसत नाही ती जास्त ओबडधोबड आहे.