पश्चिम आफ्रिकेमध्ये ‘इबोला’ साथीचा कहर, ६७२ बळी; अख्खे जग चिंताक्रांत
By admin | Published: August 1, 2014 12:45 AM2014-08-01T00:45:51+5:302014-08-01T00:45:51+5:30
पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन, लायबेरिया व गिनी या देशांत इबोला साथीचा भयावह प्रकोप झाला असून, ६७२ बळीनंतरही साथ आटोक्यात येत नसल्यामुळे अख्खे जग चिंताक्रांत झाले आहे
फ्रीटाउन : पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन, लायबेरिया व गिनी या देशांत इबोला साथीचा भयावह प्रकोप झाला असून, ६७२ बळीनंतरही साथ आटोक्यात येत नसल्यामुळे अख्खे जग चिंताक्रांत झाले आहे. इबोला विषाणूंच्या धुमाकुळाला आळा घालण्यासाठी सिएरा लिओनने सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच जाहीर केली असून, या विषाणूंची बाधा झालेल्या भागांना इतर भागांपासून अलग ठेवण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
सिएरा लिओनच्या या उपाययोजना शेजारील लायबेरियाने जाहीर केलेल्या इबोलाविरोधी पॅकेजशी मिळत्याजुळत्या आहेत. इबोला संकटामुळे राष्ट्राध्यक्ष अर्नेस्ट बाई कोरोमा यांनी आपला पुढील आठवड्यातील अमेरिका दौरा रद्द केला आहे. अमेरिका-आफ्रिका परिषदेसाठी ते वॉशिंग्टनला जाणार होते.
इबोला प्रभावित भागांना इतर भागांपासून वेगळे ठेवण्यात येणार असून पोलीस व सुरक्षा दले ही जबाबदारी सांभाळतील. पुढील ६० ते ९० दिवस या भागातील नागरिकांना इतर ठिकाणी जाण्यास तसेच इतर ठिकाणच्या नागरिकांना या भागात येण्यास मज्जाव केला जाणार आहे. याशिवाय घराघरात जाऊन इबोला रुग्णांचा शोध घेण्यात येणार असून इबोलाचा संसर्ग झालेल्यांना इतरांपासून वेगळे केले जाणार आहे.
शांतता सैनिक काढून घेतले
इबोलाच्या प्रकोपामुळे अमेरिकी शांतता सेनेने लायबेरिया, गिनी आणि सिएरा लिओनमधील आपले शेकडो शांतता सैनिक काढून घेतले आहेत. या सैनिकांपैकी दोघे इबोलामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे.
शाळा बंद
लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील शाळा बंद करण्याचे तसेच बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सिएरा लिओनलगतच्या सीमा भागातील बाजारपेठाही बंद करण्याचे आदेश जारी केले. ब्रिटनमध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोब्रा क्रायसिस मॅनेजमेंट कमिटीची बैठक घेतली.
विमानाद्वारे प्रसाराची शक्यता
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेने या साथीचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपायांवर जागतिक आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लायबेरियातून नायजेरियात आलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याचा इबोलामुळे मृत्यू झाला होता. हा कर्मचारी विमानाने नायजेरियात आला होता. त्यामुळे विमान प्रवाशांद्वारे हा आजार इतर देशांत पसरण्याची शक्यता वर्तविली जात असून आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटना याबाबत काही उपाययोजना करण्याच्या तयारीला लागल्याचे समजते. (वृत्तसंस्था)