दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमधील एका तुरुंगात हिंसक हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात 24 कैद्यांचा मृत्यू झालाय तर 48 जखमी झाले आहेत. ग्वायाकिल शहरातील तुरुंगात मंगळवारी ही हाणामारी झाली. पाच तासानंतर पोलीस आणि लष्कराला कारागृहातील परिस्थिती नियंत्रणात आणता आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगातील दोन गटात ही हाणामारी झाली. 'लॉस लोबोस' आणि 'लॉस चोनेरोस' अशी या दोन टोळ्यांची नावे आहेत. यादरम्यान गोळीबार, चाकू हल्ल्यासह बॉम्ब ब्लास्टही झाला. या घटनेचे काही फुटेजही व्हायरल झालेत, ज्यात कैदी कारागृहाच्या खिडक्यांमधून गोळीबार करताना दिसत आहेत. दरम्यान, पाच तासानंतर पोलिस आणि लष्कराला परिस्थिती नियंत्रणात आणता आली.
जुलैमध्ये मोठा संघर्ष झाला होतायाआधी जुलैमध्ये कारागृहात मोठी हिंसक चकमक झाली होती, ज्यात 100 हून अधिक कैदी मारले गेले होते. इक्वाडोरच्या कारागृहात वारंवार हिंसक चकमकी घडल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्येही हिंसक संघर्ष झाला, ज्यामध्ये 80 कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आणि बरेच जण गंभीर जखमी झाले.
तुरुंगात इतका हिंसाचार का होतो?
इक्वेडोरचे कारागृह हे ड्रग्स टोळ्यांशी संबंधित असलेल्या कैद्यांसाठी युद्धभूमीसारखे आहेत. ग्वायाकिल हे इक्वेडोरचे मुख्य बंदर शहर आहे. या कारागृहाला उत्तरेकडे विशेषत: अमेरिकेत कोकेनला पाठवण्याचे हे एक प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या आठवड्यात पोलिसांनी ग्वायाकिल तुरुंगातून दोन पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, सुमारे 500 राऊंड दारुगोळा, एक हातबॉम्ब, अनेक चाकू, दोन डायनामाइट स्टिक्स आणि घरगुती स्फोटके जप्त केली. दोन आठवड्यांपूर्वी, ग्वायाकिलच्या कारागृह क्रमांक 4 वर ड्रोनने हल्ला करण्यात आला, जो 'आंतरराष्ट्रीय कार्टेलमधील युद्धा'चा भाग होता. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.