सेनेगल फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू
By admin | Published: July 16, 2017 07:39 AM2017-07-16T07:39:19+5:302017-07-16T07:39:51+5:30
सेनेगल स्टेडियममध्ये फुटबॉल लीग कप फायनलसाठी झालेल्या स्पर्धेत चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे
ऑनलाइन लोकमत
डकार, दि. 16 - सेनेगल स्टेडियममध्ये फुटबॉल लीग कप फायनलसाठी झालेल्या स्पर्धेत चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती स्थानिक क्रीडा मंत्र्यांनी दिली आहे. या चेंगराचेंगरीत स्टेडिममवर आलेले फुटबॉलचे अनेक चाहते जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका तरुण मुलीचासुद्धा समावेश आहे.
या दुर्घटनेत जवळपास 60 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी डकारमधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सेनेगलचे क्रीडा मंत्री मातर बा यांनी दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धेचं पुन्हा आयोजन करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. स्टेडियममध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एएफपीच्या वृत्तानुसार, फुटबॉल लीग कप फायनलसाठी झालेल्या या स्पर्धेदरम्यान यूएस वाकाम आणि स्टेड डे माउबर या दोन संघांमध्ये वाद झाला. त्यानंतर यूएस वाकाम संघाच्या समर्थकांनी स्टेड डे माऊबर संघाच्या चाहत्यांवर दगडफेक करण्यास सुरुवातक केली. त्यामुळे स्टेडियममध्ये बसलेले चाहते पळापळ करू लागले. फुटबॉल पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या धावपळीत बाजूची एक भिंत कोसळली. त्याच वेळी पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
घाबरलेले प्रेक्षक गर्दीतून वाटत काढत सैरावैरा पळू लागले आणि त्यातच 8 प्रेक्षकांचा मृत्यू झाला. स्टेडियममधील भिंतसुद्धा थेट प्रेक्षकांच्याच अंगावर कोसळली. त्यातही बरेच जण जखमी झालेत. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र सेनेगल स्टेडियमवर चोख सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळेच ही दुर्घटना घटल्यानं लोकांना संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा
(पश्चिम बंगालच्या गंगासागर यात्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू)
(सबरीमाला मंदिरात चेंगराचेंगरीत 20 भाविक जखमी)