राखीव जागा सोडण्यास नकार देणा-या तरुणाच्या मांडीवर बसून वृद्ध महिलेने केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 06:11 PM2017-09-12T18:11:07+5:302017-09-12T18:11:07+5:30
चीनमधील नानजिंग शहरात मेट्रोने प्रवास करणा-या एका महिलेने राखीव जागेवर बसत नियम न पाळणा-या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे. महिला तरुणाच्या मांडीवर बसून प्रवास करत असतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
बीजिंग, दि. 12 - खचाखच भरलेल्या ट्रेन किंवा मेट्रोत प्रवास करताना बसायला जागा मिळाली तर आपल्याइतका भाग्यवान कोणी नाही असं समजावं. अनेकदा ही संधी आपल्याला निर्माण करावी लागते, तर काहीजण तिघांची क्षमता असणा-या सीटवर चौथी जागा मिळवत ही संधी निर्माण करतात. अनेकदा महिलांसाठी राखीव असणा-या जागांवर बसून काहीजण प्रवास करत असतात. इतकंच नाही तर महिला आल्यानंतर उठण्याचं कष्टही ते घेत नाहीत. अशावेळी काही महिला थेट उठायला सांगतात, तर काहीजणी शांत राहतात. मात्र चीनमधील नानजिंग शहरात मेट्रोने प्रवास करणा-या एका महिलेने राखीव जागेवर बसत नियम न पाळणा-या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे.
महिलांसाठी राखीव असणा-या जागेवर तरुण बसला होता. महिलेने तरुणाला उठवण्यासाठी सांगितलं असता, त्याने उद्धटपणे नकार दिला. यानंतर महिलेने अहिंसेचा मार्ग स्विकारत तरुणाच्या मांडीवर बसून पुढील प्रवास करण्याचा निर्णय घेतला. महिला तरुणाच्या मांडीवर बसून प्रवास करत असतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये महिला तरुणाच्या मांडीवर अत्यंत शांतपणे बसून प्रवास करत असल्याचं दिसत आहे.
अनेकदा प्रवास करताना गर्दीच्या वेळी एखादी महिला किंवा तरुणी डब्यात असेल, तर अनेकजण स्त्रीदाक्षिण्य दाखवत आपली जागा देतात. पण चीनमधील नानजिंग शहरात मेट्रोने प्रवास करताना एक तरुण महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसला होता. जागा महिलांसाठी राखीव असल्याचं समजावत महिलेने तरुणाला उठण्यास सांगितलं. सुरुवातीला महिलेने समजूतदारणे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण ऐकून घेत नसल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने वाद घालण्यास सुरुवात केली.
यानंतरही तरुण हटण्यास तयार नसल्याने अखेर महिलेने अहिंसेचा मार्ग स्विकारला. महिला थेट तरुणाच्या मांडीवर बसली आणि वाद न घालता आपला पुढील प्रवास सुरु केला. महिलेची ही कृती पाहून इतर प्रवासाही अवाक झाले. महिलेच्या या कृतीमुळे वाद तर थांबलात पण तरुणही निरुत्तर झाला. एकतर उठावं किंवा शांतपणे प्रवास करावं हे दोनच पर्याय त्याच्याकडे होते. पुढे काय झालं याचा व्हिडीओ उपलब्ध नाही, मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.