नवी दिल्ली - भारताचे नवनियुक्त परराष्ट्रसचिव विजय केशव गोखले यांच्यासाठी पुढच्या दीडवर्षाचा कालावधी आव्हानात्मक असणार आहे. डोकलामचा तिढा सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या विजय केशव गोखले यांची परराष्ट्रसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला. पुढच्या 16 महिन्यांमध्ये भारताच्या शेजारी देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. तेच गोखले यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल.
या देशांमधील काही सत्ताधारी भारताच्या बाजूने तर काही विरोधात आहेत. विरोधात असणारे पक्ष, नेत्यांच्या हाती सत्ता गेल्यानंतर भारताचे हित साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. नेपाळमध्ये डिसेंबर अखेरीस डाव्या आघाडीची सत्ता आली. के.पी.ओली पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. के.पी.ओली हे भारत विरोधी आणि चीन समर्थक नेते आहेत. सांस्कृतिकदुष्टया नेपाळ भारताच्या जवळ असला तरी नेपाळमध्ये झालेले हे सत्तापरिवर्तन भारताला मानवणारे नाही. नेपाळला चीनच्या जास्त जवळ जाण्यापासून रोखण्याचे आव्हान भारतासमोर असेल.
जून 2018 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यातून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधात फार काही सुधारणा होतील अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. सप्टेंबर 2018 मध्ये मालदीवमध्येही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या देशाचे विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आतापासूनच भारतविरोधी सूर लावला आहे. भूतानमध्येही याचवर्षी संसदीय निवडणूक होणार आहे. तिथे निवडून येणा-या नव्या सरकारची भारताबद्दलची भूमिका, दुष्टीकोन यावर संबंध ठरतील. सामरिकदुष्टीने भूतान भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. डोकलाम संघर्षात ते दिसून आले.
2018 च्या अखेरीस बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत. भारताने बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या निवडणुका भारतासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. सलग दोनवेळा सत्ता संभाळणा-या शेख हसीना यांच्या सरकारला प्रस्थापितांविरोधातील लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेजारी देशांमधील या निवडणुका भारताच्या परराष्ट्र संबंधांच्या दुष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत. चीन गुंतवणूकीच्या माध्यमातून या सर्व देशांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. भौगोलिक स्थानामुळे हे देश भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या देशांमधील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याचे आव्हान आजच्याघडीला भारतासमोर आहे.