एल्गार! पुतिनविरोधात लाखो लोक रशिय़ाच्या रस्त्यांवर; 3000 आंदोलकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 01:49 PM2021-01-24T13:49:09+5:302021-01-24T13:50:22+5:30
Russia Alexei Navalny arrest : पुतिन सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु झाले असून यामध्ये लाखो लोकांनी भाग घेतला आहे. विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेविरोधात रशियाच्या जवळपास १०० शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
देशातील तीन मोठ्या देशांमध्ये त्या त्या देशांच्या प्रमुखांविरोधात जनतेत मोठा रोष दिसत आहे. अमेरिकेत गेल्या पंधरवड्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे झालेला विरोध, भारतात कृषी कायद्यांविरोधात मोदी सरकारविरोधात लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. तर तिसरा देश रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात लाखो लोक मॉस्कोच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
पुतिन सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु झाले असून यामध्ये लाखो लोकांनी भाग घेतला आहे. विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेविरोधात रशियाच्या जवळपास १०० शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून 3000 हून अधिक लोकांना अटक केली आहे. नवेलनी यांच्या पत्नी युलिया यांनीदेखील आंदोलनात भाग घेतला होता. त्य़ांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
मॉस्कोमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसेच त्यांना फरपटत पोलीस वाहनांमध्ये टाकले. नवेलनी यांना 17 जानेवारीला अटक करण्यात आली आहे. नवेलनी हे पुतिन यांचे कट्टर विरोधक मानले जातात. ऑगस्ट 2020 मध्ये नवेलनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. विमान प्रवासात त्यांना विषमिश्रित पेय देण्यात आले होते. यानंतर त्यांची अवस्था गंभीर झाली होती. यातून बरे झाल्यानंतर नवेलनी हे जर्मनीच्या आश्रयासाठी आले होते. विश्रांती घेतल्यानंतर बर्लिन येथून नवेलनी 17 जानेवारीला मॉस्कोला परतले. यावेळी त्यांना विमानतळावरच अटक करण्यात आली. नवेलनी यांनी पेरोलच्या अटी तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर नवेलनी यांनी मला गप्प करण्यासाठी रचलेले कुभांड असल्याचा आरोप केला आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोपासून दूरवर असलेल्या सायबेरिया, सेंट पीटर्सबर्ग पर्यंत लोक रस्त्यांवर उतरले आहेत. या आंदोलकांमध्ये कॉलेज विद्यार्थी ते वरिष्ठ नागरिकांपासून सारे सहभागी झाले आहेत. रशिया देश तुरुंगात बदलला आहे, यामुळे मी आंदोलनात उतरत असल्याचे एका आंदोलक महिलेने सांगितले.
मॉस्कोमध्ये 40000 लोकांनी आदोलनात भाग घेतला आहे. तर रशिया सरकारने सांगितले की, केवळ 4000 आंदोलक होते. तर रशियातील जाणकारांनी हे अभूतपूर्व आंदोलन असल्याचे सांगत मोठे आंदोलन होत असल्याचे म्हटले आहे.