ट्विटरवरून ट्रम्पना 'सस्पेन्ड' करणाऱ्या विजया गाड्डेंची नोकरी धोक्यात? मस्क नारळ देण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 01:06 PM2022-04-27T13:06:16+5:302022-04-27T13:08:55+5:30
ट्विटरचे सीईओ पराग अग्रवारल यांच्या गच्छंतीची चर्चा असताना आता विजया गाड्डेंचं नावही चर्चेत
मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची नोकरी धोक्यात आली आहे. मस्क अग्रवाल यांची गच्छंती करण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे. कंपनीच्या धोरण प्रमुख विजया गाड्डे यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या स्पॉन्सरशिप संबंधीचे निर्णय विजया गाड्डेंना जबाबदार मानलं जात आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बॅन करण्याचा निर्णय गाड्डेंनी घेतला होता. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात गाड्डे भावुक झाल्या, त्यांना अश्रू अनावर झाले होते. ट्विटरचे नवे मालक मस्क यांनी गाड्डे यांनी आखलेल्या सेन्सॉरशिपच्या धोरणांवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या सोशल मीडियावर मस्क आणि ट्रम्प यांचे चाहते गाड्डेंना लक्ष्य करत आहेत. त्यांच्याविरोधात शेरेबाजी केली जात आहे.
विजया गाड्डे आहेत तरी कोण?
४८ वर्षांच्या विजया गाड्डे ट्विटरची कायदेशीर आणि संवेदनशील प्रकरणं हाताळतात. त्या २०११ पासून ट्विटरमध्ये काम करत आहेत. तेव्हापासून त्या कंपनीच्या कायदा आणि धोरणाशी संबंधित प्रकरणं पाहतात. ट्विटरच्या कार्यकारी टीममधील सर्वात शक्तीशाली महिला समजल्या जातात. गाड्डे यांचा जन्म भारतात झाला आहे. अमेरिकेत उसळलेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बॅन करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता.