मुंबई ते सिंगापूर विमानात बॉम्ब असल्याची धमकी, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:07 PM2019-03-26T12:07:45+5:302019-03-26T12:09:12+5:30
मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं.
चांगी - मुंबई ते सिंगापूर जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ माजली. मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं.
विमानातील पायलटला बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यानंतर तात्काळ पायलटने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केली. चांगी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान सुखरुप उतरवण्यात आले. या विमानात 263 प्रवाशी प्रवास करत होते. विमान लॅंडिंग झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली त्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आलं.
सिंगापूर एअरलाइन्सचे एसक्यू विमान 423 स्थानिक वेळेनुसार 11.35 मिनिटांनी मुंबईवरुन सिंगापूरसाठी उड्डाण घेतले. विमान उडल्यानंतर काही वेळात एअरलाइन्सला निनावी फोन आला यामध्ये विमानात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर तातडीने विमान चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आले.
Mid-air bomb hoax on Mumbai to Singapore-bound Singapore Airlines flight
— ANI Digital (@ani_digital) March 26, 2019
Read @ANI Story | https://t.co/9o1wNyXdVOpic.twitter.com/3DA5VKRTRz
विमानाची आपत्कालीन लॅंडिंग मंगळवारी सकाळी 8 वाजता झाली. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरविण्यात आले. मात्र त्याआधी प्रवाशांनाही सुरक्षा यंत्रणांना सामोरे जावे लागले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी या विमानातील एक महिला आणि मुलाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे.
सिंगापूर एअरलाइन्सने या बातमीला दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले की, मुंबईवरुन सिंगापूरला जाणाऱ्या या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. सिंगापूर एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विमान 26 मार्च रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजता सिंगापूरला पोहचलं होतं. त्यात 263 प्रवाशी होते. आम्ही सुरक्षा अधिकाऱ्यांच्या चौकशीला सहकार्य करत आहोत. याहून अधिक माहिती आम्ही देऊ शकत नाही.