निवडणुकांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी फेसबुक कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:45 AM2018-04-12T03:45:54+5:302018-04-12T03:45:54+5:30
आगामी काळात भारत, मॅक्सिको, पाकिस्तान, ब्राझिल, अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे पावित्र्य अबाधित राहिल यासाठी फेसबुक पूर्ण काळजी घेणार आहे, असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेससमोर दिलेल्या साक्षीत म्हटले आहे.
वॉशिंग्टन : आगामी काळात भारत, मॅक्सिको, पाकिस्तान, ब्राझिल, अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे पावित्र्य अबाधित राहिल यासाठी फेसबुक पूर्ण काळजी घेणार आहे, असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेससमोर दिलेल्या साक्षीत म्हटले आहे. यावेळी त्यांनी माफीनामाही सादर केला.
लाखो लोकांची वैयक्तिक माहिती फेसबुकवरुन केंब्रिज अॅनालिटिकाने चोरुन तिचा काही निवडणुकांच्या कामासाठी वापर केल्याची प्रकरणे उजेडात आल्याने खळबळ माजली. त्यासंदर्भात झुकरबर्ग यांची दोन दिवस साक्ष होईल. झुकरबर्ग यांनी माफीनाम्यात म्हटले की, फेसबुक वापरकर्त्यांच्या माहितीचे संरक्षण तसेच निवडणुकांमध्ये होणारा परकीय हस्तक्षेप या मुद्द्यांवर कंपनीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. या मुद्द्यांसंदर्भात यापुढे कोणालाही तक्रारीला वाव मिळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. याआधीही झुकरबर्गनी फेसबुक वापरकर्त्यांची जाहीर माफी मागितली होती.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स टुलचा वापर सुरु
फ्रान्स, जर्मनीमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या तीन निवडणुकांवेळी मात्र फेसबुक दक्ष राहिले होते. या निवडणुकांवर प्रभाव पाडू शकणारी काही हजार अकाऊंट त्यावेळी बंद केली होती. आता फेसबुकने नवीन आर्टि फिशियल इंटेलिजन्स टुलचा वापर सुरु केला असल्याचे झुकरबर्ग म्हणाले.
>राहुल गांधींनी
माफी मागावी
भारतीय निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिकाने ढवळाढवळ केल्याचे स्पष्ट झाल्याने आणि यापुढे असे होऊ न देण्याची फेसबूकने ग्वाही दिल्याने राहुल गांधी यांनीही देशाची माफ मागावी आणि समाजात फूट पाडण्याचे असे उद्योग पुन्हा न करण्याची हमी द्यावी.
- रविशंकर प्रसाद,
माहिती व तंत्रज्ञानमंत्री (टिष्ट्वटरवर)