न्यूयॉर्क - वेगवान गाडी चालविण्याच्या नादात अनेकदा मोठमोठे अपघात होऊन लोकांचे जीव गेल्याचं नेहमी ऐकायला मिळतं. त्यात सोशल मीडियाच्या नशेत स्टंट म्हणून उत्साही लोक वेगवान कार चालविण्याचा व्हिडीओ बनवित असतात. असाच एक अमेरिकेतील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये वेगवान कारला जोरदार अपघात झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
अमेरिकेतील २३ वर्षीय हॉफलर या युवकाचा मेमोरियल ब्रीजवर गाडी वळविताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. हा अपघात होण्यापूर्वी कारचालक हॉफलर फेसबुक लाईव्ह करत होता. हा व्हिडीओ रेकॉर्ड होत असताना यामध्ये कारचालक १२० पेक्षा अधिक गतीने ही गाडी चालवत असल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ सुरु असताना काही मिनिटानंतर एका वळणावर कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीचा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने चालकाला गंभीर दुखापत झाली नाही
हा व्हिडीओ पोलिसांनीफेसबुक पोस्ट करत लोकांना काळजीपूर्वक गाडी चालविण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, या वाहनाचा चालक गाडी चालवत फेसबुक लाईव्ह करत होता. यावेळी जीवाची कोणतीही पर्वा न करता तो गोल्ड स्टार मेमोरियल ब्रीजवर अतिशय वेगात गाडी चालवित होता. या ब्रिजवर गाडीची वेगमर्यादा ताशी ५५ किमी असणं बंधनकारक असताना या वेगात गाडी चालविताना त्याचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे गाडी काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे चालवा असं त्यांनी सांगितले.