मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा, पुढच्या आठवड्यात फेसबुकचे 'हे' फीचर बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 11:04 AM2021-11-03T11:04:37+5:302021-11-03T11:05:46+5:30
फेसबुकच्या या निर्णयामुळे 1 अब्जांपेक्षा जास्त फेसबुक युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गने त्यांच्या फेसबुक कंपनीचे नाव मेटा केले आहे. त्यानंतर आता फेसबुकने आपल्या फेसबुक अॅपमध्ये एक मोठा बदल केला आहे. फेसबुकने केलेल्या बदलानुसार, आता यापुढे तुम्ही फोटो अपलोड केल्यावर दुसऱ्याला ऑटो टॅग होणार करणार नाही. गोपनीयतेवरुन फेसबुकवर झालेल्या आरोपांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
या मोठ्या बदलाची अधिकृतरित्या घोषणा फेसबुककडून करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून फेसबुकवर स्वतःच्या फायद्यासाठी युजरच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप लागत आहेत. त्यानंतर आता कंपनीने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेसबुकने म्हटले की, कंपनी आता चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान बंद करेल. तसेच, फेसबुकच्या सर्वरमध्ये असलेल्या एक अब्जाहून अधिक लोकांच्या प्रिंट डिलीट करणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला ऑटो टॅग ऑप्शन मिळणार नाही.
काय आहे ऑटो टॅग ?
तुम्ही अनेकदा फेसबुकवर स्वतःचा किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत काढलेला फोटो अपलोड केला असेल. तेव्हा फेसबुक त्या फोटोतील तुम्हाला आणि व्यक्तीला तुमच्यासोबत टॅग करत होते. फेसबुक हे सर्व आपल्या फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीच्या मदतीने करत असे. खरं तर, फेसबुक आपल्या वापरकर्त्यांचे चेहरे त्यांच्या सर्व्हरवर सेव्ह करुन त्याचा वापर करत असे. हे सर्व फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जायचे. यावरुन फेसबुकवर युजरची माहिती चोरल्याचा आरोप लागला होता. यामुळे कंपनीला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला आहे. पण, आता येत्या आठवडाभरात हे तंत्रज्ञान बंद करण्याची फेसबुकने घोषणा केली आहे.
सर्व्हरवरुन डेटा डिलीट करणार
हे तंत्रज्ञान बंद करण्यासोबतच फेसबुक आपल्या सर्व्हरवर असलेला शेकडो कोटी चेहऱ्यांचा डेटा काढून टाकणार आहे. फेसबुकचे हे तंत्रज्ञान गोपनीयतेच्या मुद्द्यामुळे बऱ्याच काळापासून वादात होते. या तंत्रज्ञानामुळे फेडरल ट्रेड कमिशनने 2019 मध्ये फेसबुकला $500 मिलियनचा दंड ठोठावला होता. तसेच, फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीमुळे गेल्या वर्षी अमेरिकेतील इलिनॉय राज्यात, फेसबुकने त्यांच्याविरुद्धच्या खटल्यात 'फेस जिओमेट्री'सह तक्रारकर्त्यांना बायोमेट्रिक माहितीच्या वापरावर तोडगा काढण्यासाठी $650 दशलक्ष दिले होते.
यामुळे कंपनीचे नावही बदलले
फेसबुकच्या या तंत्रज्ञानाला विरोध करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन आणि बायोमेट्रिक माहिती फेसबुककडे असणे हे होते. मात्र, गेल्या महिन्यात फेसबुकचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेनने फेसबुकचे अंतर्गत दस्तावेज लीक केले होते, त्यानंतर फेसबुककडून मोठा विरोध झाला होता. कंपनी वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचा आरोप करण्यात आला. ही चूक सुधारण्यासाठी त्याने आपल्या कंपनीचे नावही बदलले होते.