२३० कोटी लोकांच्या नशिबी गोवऱ्या अन् लाकडेच; ६७.५० कोटी नागरिकांकडे नाही वीज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 08:37 AM2023-06-08T08:37:55+5:302023-06-08T08:39:19+5:30
सुमारे ६७.५० कोटी लोकांकडे वीज नसल्याचे पाच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालातून समोर आले.
न्यूयॉर्क : एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी स्वच्छ इंधनाचा आग्रह केला जात असताना, जगभरातील २३० कोटी नागरिक स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा, गोवऱ्या यांसारख्या प्रदूषणकारी इंधनांचा वापर करतात. तर, सुमारे ६७.५० कोटी लोकांकडे वीज नसल्याचे पाच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालातून समोर आले.
कोणी केला अभ्यास?
संयुक्त राष्ट्राचा सांख्यिकी विभाग, आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्राधिकरण, आंतरराष्ट्रीय अपारंपरिक ऊर्जा प्राधिकरण, जागतिक बँक आणि जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली.
प्रयत्न अपुरे
- २०३० पर्यंत जगभरातील सर्वांना किफायतशीर, विश्वसनीय, टिकाऊ आणि आधुनिक ऊर्जा उपलब्ध करण्याचे लक्ष्य २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्राने ठेवले होते. परंतु, त्यादृष्टीने प्रयत्न अपुरे पडत आहेत.
- २०३० पर्यंत ६६ कोटी नागरिकांकडे वीज आणि १९० कोटी नागरिकांकडे स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन नसेल. त्याचा थेट परिणाम हवामान बदलाच्या माध्यमातून सर्वांवर होईल, असाही इशारा अहवालात देण्यात आला.
ग्रामीण भागात विद्युतीकरण वाढत असले, तरी शहरी भागात ते वाढवण्याची आवश्यकता असल्याचेही अहवालात म्हटले आहे. जगात वीजजोडणी नसलेल्या एकूण नागरिकांपैकी ८० टक्के (५६.७ कोटी) नागरिक उपसहारा आफ्रिकेतील आहे.
३७ टक्के नागरिकांकडे भारतात अस्वच्छ इंधन
देशातील ३७ टक्के नागरिक अद्याप स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा, गोवऱ्या आदी प्रदूषणकारी इंधनांचा वापर करतात. ग्रामीण भागात हेच प्रमाण तब्बल ५० टक्के असल्याचे एनएसएसओच्या अहवालात म्हटले आहे. शहरी भागात मात्र ९२ टक्के नागरिक स्वच्छ इंधनाचा वापर करतात.
जागतिक पातळीवर वीजजोडणीची स्थिती: २०१० – ८४ टक्के, २०२१ - ९१ टक्के.