९/११ हल्ला; साैदीच्या सहभागाबद्दल संशय; एफबीआयने जारी केला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 07:31 AM2021-09-13T07:31:53+5:302021-09-13T07:32:26+5:30
हल्लेखाेर हाेते साैदी अरेबियन नागरिकांच्या संपर्कात
वाॅशिंग्टन : अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यात साैदी अरबचा हात हाेता का? हा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयने या हल्ल्याशी संबंधित १६ पानी गाेपनीय दस्तऐवज जारी केले. त्यात विमानाचे अपहरण करणाऱ्यांना अमेरिकेतील साैदी अरबच्या दाेन नागरिकांची मदत मिळाल्याचा उल्लेख आहे. मात्र, साैदी सरकारचा हल्ल्यात सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा नसल्याचाही त्यात उल्लेख करण्यात आला आहे.
९/११च्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे झाल्यानंतर एफबीआयने हा दस्तऐवज सार्वजनिक केला. यासाठी राष्ट्रपती जाे बायडेन यांच्यावर मृतकांच्या कुटुंबीयांनी दबाव आणला हाेता. बायडेन यांनी गेल्या आठवड्यात तपासातील कागदपत्रांचा डिक्लासिफिकेशन आढावा घेऊन सहा महिन्यांमध्ये ते जनतेसमाेर आणावे, असे निर्देश न्याय विभाग व इतर तपास यंत्रणांना दिले हाेते. त्यानंतर हा पहिला अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे.
यामुळे साैदी अरबवर संशय
नवाफ अल-हाझमी आणि खलीद अल-मिहधार या दाेन हल्लेखाेरांना ओमर अल-बयूमी या साैदी नागरिकाने सॅन डिएगाे येथे भाड्याने घर मिळवून देण्यासाठी मदत केली हाेती. ओमरचे साैदी सरकारसाेबत संबंध हाेते. त्यामुळेच एफबीआयचा साैदीवर संशय निर्माण झाला.
अहवालात अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या एका व्यक्तीच्या २०१५ मध्ये घेतलेल्या मुलाखतीचा उल्लेख करण्यात आला आहे. ही व्यक्ती हल्लेखाेरांना मदत करणाऱ्या साैदी अरबच्या नागरिकांसाेबत सतत संपर्कात हाेती.
९/११च्या हल्ल्यातील १९ हल्लेखाेरांपैकी १५ हल्लेखाेर साैदी अरबचे नागरिक हाेते. विशेष म्हणजे, अल कायदाचा तत्कालीन नेता ओसामा बिन लादेन हा साैदीतील प्रसिद्ध कुटुंबाचा सदस्य हाेता.
हल्ल्यात साैदी सरकारचा संबंध असल्याचा कुठलाही पुरावा आढळला नाही. मात्र, साैदी सरकारतर्फे पुरस्कृत धर्मदाय संस्थांचा संबंध असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकेतील साैदी दूतावासाने हल्ल्यात सहभागी असल्याचे आराेप सातत्याने फेटाळले आहेत. साैदी अरबवर हाेणारे आराेप चुकीचे आहेत, असे स्पष्ट करताना अमेरिकेने सर्व रेकाॅर्ड्स जगासमाेर उघड करावे, असे आवाहनही दूतावासाने केले आहे.
जाे बायडेन यांची श्रद्धांजली
वाॅशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती जाे बायडेन आणि त्यांची पत्नी जिल यांनी अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ राेजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना नॅशनल पेंटागाॅन ९/११ स्मारक येथे श्रद्धांजली वाहिली. हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर तसेच पेंटागाॅनवर हल्ला केला हाेता. त्यात पेंटागाॅन येथे १८४ जणांचा मृत्यू झाला हाेता. उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि त्यांचे पती डग एमहाॅफ यांनीही स्मारकाच्या ठिकाणी येऊन श्रद्धांजली वाहिली.
विभाजन आणि दहशतवादाची भीती- जाॅर्ज डब्ल्यू. बुश
विभाजन आणि दहशतवादाच्या तावडीत राष्ट्र सापडण्याची भीती अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जाॅर्ज डब्ल्यू. बुश यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकन नागरिकांनी २० वर्षांपूर्वी ९/११च्या हल्ल्यानंतर दाखविलेली सहयाेगाची भावना पुन्हा दाखवावी, असे आवाहन बुश यांनी केले. त्यावेळी बुश यांनी देशांतर्गत हिंसेवरून इशाराही दिला. बुश यांचा इशारा माजी राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटलमध्ये केलेल्या हिंसाचारावरून हाेता.
कॅपिटल हल्ला; ६ प्रकरणात कारवाईची पोलिसांची शिफारस
सहा जानेवारीला कॅपिटलवर (अमेरिकी संसद भवन) करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर कॅपिटल पोलिसांना अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत अंतर्गत चौकशीनंतर सहा प्रकरणांत शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार व्यावसायिक जबाबदार कार्यालयाला ३८ प्रकरणांची अंतर्गत चौकशी करून २६ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे आढळले. २६ प्रकरणांत कोणताही गैरप्रकार आढळला नाही. तथापि, सहा प्रकरणांत उल्लंघन झाल्याचे आढळल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली. यापैकी तीन प्रकरणे अशोभनीय आचरण, एक प्रकार निर्देशांचे पालन न करणे आणि एक अनुचित टिप्पणीचे आणि एक अयोग्यरित्या माहिती देण्याचा आहे.
अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. अमेरिकेच्या ॲटर्नी कार्यालयाला कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध गुन्ह्याला दुजोरा देणारा पुरावा मिळाला नाही.
अनेकांवर आरोप...
- राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा निवडणुकीत विजय प्रमाणित करण्यापासून रोखण्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांच्या जमावाने कॅपिटलवर हल्ला केला होता.
- ६ जानेवारीच्या या घटनेप्रकरणी सहाशेहून अधिक लोकांवर आरोप आहेत. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर नंतर एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला होता.