पाकिस्तान पुरता कंगाल झाला आहे. पीसीबीकडे क्रिकेटपटूंचे मानधन द्यायला पैसे नाहीत, तर पाकिस्तान सरकारकडे जनतेला पोटभर खायला घालायला अन्न नाहीय. अशातच दहशतवाद्यांनाही पोसायचेय आणि लष्करालाही. यामुळे आता पाकिस्तानने जवळपास दहा लाख एकर जमीन ताब्यात घेतली आहे. आता या जमिनीवर पाकिस्तानी सैनिक शेती करणार आहेत.
पाकिस्तानने सैनिकांना शेती करण्यासाठी रणगाड्यांमधून उतरवून थेट ट्रॅक्टरवर बसविले आहे. पाकिस्तानचे सैन्य गरिबीने पिचलेल्या लोकसंख्येसाठी अन्न पिकवण्यासाठी सरकारी मालकीच्या मोठ्या भूभागावर कब्जा करत आहे. या निर्णयामुळे आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये सैन्याच्या या भूमिकेवरून भिती निर्माण झाली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नवीन अन्न सुरक्षा अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे निक्केई आशियाच्या बातमीत म्हटले आहे. हे काम सिव्हिल मिलिटरी इन्व्हेस्टमेंट बॉडीच्या माध्यमातून केले जाईल. दिल्लीपेक्षा जवळपास तिप्पट मोठ्या असलेल्या भूभागावर सैन्य कब्जा करत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 405,000 हेक्टर जमीन ताब्यात घेतली जाणार आहे.
यामुळे पीक उत्पादन चांगले होईल आणि पाण्याची बचत होईल. परकीय चलन साठा आणि वस्तूंच्या वाढत्या किमती यामुळे पाकिस्तानला याची नितांत गरज आहे, असा दावा पाकिस्तानी सैन्य करत आहे. लष्कर आधीच खूप शक्तिशाली आहे. अशा परिस्थितीत, अन्न सुरक्षा अभियानातून मोठा नफा मिळू शकतो आणि ते त्याचा वापर आणखी शक्तीशाली बनण्यासाठी करू शकतात अशी भीती पाकिस्तानी लोकांना वाटू लागली आहे. यातून पाकिस्तानच्या कोट्यवधी ग्रामीण भूमिहीन गरीबांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.