मुंबई: युरोपच्या बाल्टिक समुद्रात 335 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भीषण आग लागली आहे. हे जहाज जर्मनीच्या केलहून लिथुआनियातील क्लाईपेडा जात होतं. जहाजाच्या इंजिन रुममध्ये स्फोट झाल्यामुळे जहाजाला आग लागल्याची प्राथमिक माहिती लिथुआनियाच्या संरक्षण दलाकडून देण्यात आली आहे. अद्याप यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भीषण आग लागलेल्या जहाजावरील प्रवाशांची सुटका करण्याचं काम लिथुआनियाच्या संरक्षण दलांकडून सुरू करण्यात आलं आहे. जहाजातील लोकांची सुटका करण्यासाठी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आल्याचं वृत्त स्काय न्यूजनं दिलं आहे. गरज पडल्यास आणखी दोन हेलिकॉप्टर प्रवाशांच्या सुटकेसाठी पाठवली जाणार आहेत. डेनिस फेरी कंपनीच्या मालकीचं रेगीना सीवेज जहाज जर्मनीहून लिथुआनियाला जात होतं. यामध्ये 294 प्रवासी आणि 41 कर्मचारी आहेत. जहाजाच्या इंजिन रुममध्ये स्फोट झाल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. मात्र जहाजात आग लागल्याच्या वृत्ताला अद्याप कंपनीनं दुजोरा दिलेला नाही. रशियाच्या सागरी हद्दीत ही दुर्घटना घडल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.
335 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला भर समुद्रात भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 8:09 PM