वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परस्परांचे कट्टर विरोधक असणारे अमेरिका आणि रशिया वेळोवेळी स्वत:च्या लष्करी सामर्थ्याचेही प्रदर्शन करत असतात. सोमवारी काळया समुद्रात अमेरिका आणि रशियाच्या लढाऊ विमानांमध्ये संघर्षाची स्थिती उत्पन्न झाली होती. अमेरिकन नौदलाचे टेहळणी विमान आणि रशियाचे फायटर जेट एसयू-27 परस्परांच्या अत्यंत निकट आले होते. दोन्ही विमानांमध्ये फक्त पाच फुटांचे अंतर होते. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.
अमेरिकेने रशियाकडे या घटनेचा निषेध नोंदवला आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करावे असे अमेरिकेने रशियाला सुनावले आहे. रशियाने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अमेरिकेच्या हेरगिरी करणा-या विमानाला रोखताना सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेण्यात आली होती असे रशियाने म्हटले आहे. अमेरिकन नौदलाचे EP-3 हे हेरगिरी विमान आंतरराष्ट्रीय मोहिमेवर असताना रशियन रडारवर ट्रेस झाले.
या विमानाला अटकाव करण्यासाठी रशियाचे एसयू-27 लगेच हवेत झेपावले. ही दोन्ही विमाने काळया समुद्रावरुन उड्डाण करत असताना त्यांच्यातील अंतर अत्यंत कमी होते. दोन तास चाळीस मिनिटे एसू-27 ने पाठलाग केला असा आरोप अमेरिकेने केला आहे. रशियन लष्कराला आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत उड्डाण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सुरक्षिततेसाठी जे आंतरराष्ट्रीय निकष आहेत त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे असे अमेरिकेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
काळया समुद्रात रशियाच्या हवाई हद्दीजवळ आम्हाला एक हवाई टार्गेट दिसले. आमचे एसयू-27 तात्काळ त्या टार्गेटच्या दिशेने झेपावले. टार्गेट जवळ पोहोचल्यानंतर ते अमेरिकन नौदलाचे टेहळणी विमान असल्याचे समजले. आमचे फायटर विमान ЕР-3Е पासून सुरक्षित अंतरराखून उड्डाण करत होते असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
दोन्ही देशांमध्ये हवाई संघर्ष होण्याची ही पहिली वेळ नाहीय. मागच्या महिन्यातही सीरियाच्या आकाशात या दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेच्या दोन फायटर विमानांनी इसिस विरोधातील जमिनीवरील कारवाईला मदत करण्याऐवजी रशियन फायटर विमानांचा पाठलाग केला. आम्ही सक्रिय असलेल्या भूप्रदेशात रशियन फायटर विमाने घुसल्यामुळे पाठलाग करावा लागला असे अमेरिकेने म्हटले होते. त्यावेळी सुद्धा ही विमाने इतकी जवळ आली होती कि, एसयू-25 बरोबर हवेतील टक्कर टाळण्यासाठी एफ-22 फायटर जेटच्या वैमानिकाला हवाई कसरतीचे कौशल्य दाखवावे लागले.