सॅक्रामेंटो : कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये गुरुवारी भीषण आग लागली आहे. यामुळे आसपासच्या नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जवळपास 2 लाख कुटुंबांचा वीजप्रवाह खंडीत झाला असून रात्र अंधारात घालवावी लागली आहे.
यूएसए टुडेच्या वृत्तानुसार ही आग विझविण्यासाठी 50 हून अधिक बंब, आठ एअर टँकर आणि तीन बुलडोझरसह 500 हून अधिक अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारपासून कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. आगीने रौद्ररुप घेतले असून आगीची झळ समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या रहिवासी भागालाही बसू लागली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे.
स्थानिक रहिवाशांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आग 20 मिनिटांत 200 एकरावर परली होती. या तिव्रतेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असून अने इमारतीही बाहेरून जळाल्या आहेत.
याआधी 12 ऑक्टोबरला दक्षिणी कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये आग लागली होती. यामुळे तेथील 1 लाख लोकांना स्थलांतर करावे लागले होते. अनेक घरे भस्मसात झाली होती. आजची आग विझविण्यासाठी काही दिवस लागू शकतात असे एका अधिकाऱ्याने सांगितले.