बीजिंग : कोरोना साथीच्या उगमस्थानाचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पाठविलेले आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे एक पथक चीनमध्ये गुरुवारी दाखल झाले. त्याचवेळी या देशात मे महिन्यापासून आतापर्यंतच्या कालावधीतील पहिल्या कोरोना बळीची नोंदही गुरुवारीच झाली.
कोरोना साथीच्या प्रसारामुळे उत्तर चीनमधील २.८ कोटी लोक हे लॉकडाऊनच्या बंधनात अडकले आहेत. तसेच त्या देशातील एका प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. चीनमध्ये काही ठिकाणी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ही पावले उचलण्यात आली. त्या देशात आठ महिन्यांनंतर कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. हेबेई प्रांतातील या घटनेबद्दल राष्ट्रीय आरोग्य आयोगाने फारशी माहिती दिलेली नाही. चीनमध्ये शेवटचा कोरोनाचा बळी गेल्या वर्षी १७ मे रोजी नोंदविला गेला होता. त्यानंतर आता आठ महिन्यांनी नवा रुग्ण सापडला आहे.
शास्त्रज्ञ राहणार दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये चीनमध्ये दाखल झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांच्या पथकामध्ये १३ जणांचा समावेश आहे. या शास्त्रज्ञांना दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. कोरोना साथीच्या उगमस्थानाचा शोध घेण्याची मोहीम खूपच विलंबाने सुरू झाली आहे. चीनने कोरोनाचा विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेत तयार केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.