वॉशिंग्टन : माणसाने सूर्यावर स्वारी करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे. पार्कर सोलार प्रोब हे नासाचे अंतराळयान ३१ जुलै रोजी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. हे अंतराळयान हवाई दलाच्या विमानातून फ्लोरिडा येथे नेण्यात आले असून तिथे त्याच्या काही चाचण्या घेण्यात येत आहेत. डेल्टा आयव्ही अग्निबाणाच्या सहाय्याने पार्कर सोलार प्रोब अवकाशात प्रक्षेपित करण्यात येईल. ते सूर्याच्या अगदी जवळ जाणार आहे. आजवर तिथपर्यंत मानवनिर्मित एकही गोष्ट पोहोचू शकलेली नाही. सूर्यातून होणारा किरणोत्सार, तसेच प्रचंड तप्त वातावरण याचा सामना करत पार्कर सोलार प्रोबला आपले शोधकार्य पार पाडावे लागणार आहे. सौरवायू, तसेच ग्रहमालेतील व पृथ्वीजवळील हवामानावर परिणाम करणारे सूर्याच्या पृष्ठभागावरील घटक यांचा अभ्यास या मोहिमेत करण्यात येईल. पार्कर सोलार प्रोब अंतराळयानाला थर्मल प्रोटेक्शन सीस्टिम किंवा हिट शिल्ड बसविण्याचेही काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. सूर्यावर प्रचंड उष्णता असून, त्यापासून हिटशिल्ड या अंतराळयानाचे संरक्षण करेल.>सात वर्षे चालणार मोहीमअमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीतील प्रार्कर सोलार प्रोब प्रकल्पाचे व्यवस्थापक व शास्त्रज्ञ अँडी ड्राईजमन यांनी सांगितले की, हा प्रकल्प साकारण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अतिशय परिश्रम घेतले आहेत. नासाच्या फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातून या प्रोब सोलार प्रोबचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा कालावधी सात वर्षांचा आहे.
जुलैमध्ये सूर्यावर पहिली स्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 1:58 AM