जोहान्सबर्ग, दि. 16 - झिम्बाब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे यांच्यावर एका 20 वर्षीय मॉडेल तरूणीला मारहाण करण्याचा आरोप आहे. याबाबत त्या मॉडेलने दक्षिण आफ्रिका पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रपतींच्या पत्नीने आपल्यावर हल्ला करून जखमी केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे कपाळावर झालेल्या जखमेचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
20 वर्षीय मॉडेल गॅब्रिएला एंजेल्स ही दक्षिण आफ्रिकेची आहे. या प्रकरणात ग्रेस मुगाबे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयात हजेरी लावणं गरजेचं होतं. पण त्या न्यायालयात उपस्थित राहिल्या नाहीत. प्रकरणाच्या चौकशीमध्ये ग्रेस मुगाबे सहकार्य करत होत्या, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नव्हती. मंगळवारी त्या न्यायालयात उपस्थित राहणार होत्या, पण आम्हाला आश्वासन दिल्यानंतरही त्या कोर्टात हजर राहिल्या नाहीत अशी माहिती दक्षिण अफ्रीकेचे पोलीस प्रमुख फीकिले बालूला यांनी दिली.
मीडिया रिपोर्टनुसार, रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे जोहान्सबर्ग येथील एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. तेथे आपल्या दोन मुलांना मॉडेल गॅब्रिएला एंजेल्स हिच्यासोबत पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी गॅब्रिएला एंजेल्स हिच्यावर हल्ला करत तिला मारहाण केली आणि जखमी केलं. दक्षिण अफ्रीकेच्या एका न्युज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, मॉडेल गॅब्रिएला आपल्या एका मित्रासोबत मुगाबे यांच्या मुलांची (रॉबर्ट आणि चाटुंगा) भेट घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली होती. कॅपिटल 20 वेस्ट या हॉटेलच्या रूममध्ये त्यांची भेट घेत असतानाच ग्रेस मुगाबे रूममध्ये आल्या. गॅब्रिएला हिला मुलांसोबत पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी गॅब्रिएलावर हल्ला करून तिला जखमी केलं.