कॅनडाच्या पंतप्रधानांचं फ्लिप जगभर गाजतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:56 AM2020-04-30T02:56:32+5:302020-04-30T02:57:09+5:30
हॉलिवूड स्टारपेक्षा जास्त तरुण नेटिझन्स सध्या ट्रुडो यांच्यावर फिदा आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा व्हिडिओ पाहिला? तो जगभर व्हायरल झालाय. तरुण मुलींच्या ‘दिल की धडकन’ व तरुणांना ‘स्टाइल व स्माइल गोल्स’ त्यांनी दिलं आहे, अशी चर्चा आॅनलाइन जगात आहे. हॉलिवूड स्टारपेक्षा जास्त तरुण नेटिझन्स सध्या ट्रुडो यांच्यावर फिदा आहेत. ते राष्टÑाला उद्देशून भाषण करीत होते. बोलताना त्यांचे केस डोळ्यावर आले व त्यांनी ते अशा नजाकतीनं मागे सारले की सारं जग ते पाहत राहिलं; कारण त्यांची स्टाइल पाहून तरुण म्हणाले, ‘पंतप्रधान असा स्टायलिश पाहिजे.’
यावरून खूप चर्चा झाली. रंगतदार मिम्सही तयार झाल्या. कॅनेडियन पंतप्रधानांची ही अदाच नाही, तर त्यांची एक कृती पाहून तरुण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकताहेत. त्यांचं पारदर्शक वागणं तरुणांना आधीच आवडलेलं होतं. पत्नीला संसर्ग झाला, तर त्यांनी स्वत:हून ते जाहीर करून स्वत:ला १४ दिवस क्वारंटाईन करून घेतलं. काहीही लपवलं नाही की कोरोना झाला किंवा होऊ शकेल, याचा बाऊ केला नाही. सामाजिक घृणा या आजारासंदर्भात जावी म्हणून त्यांनी कृतीतून बरंच काही सांगितलं. आता त्यांनी त्यापुढचं पाऊल आपल्या देशातल्या तरुण मुलांसाठी उचललं आहे.
त्यांनी तरुणांसाठी त्यातही विद्यार्थ्यांसाठी ९०० कोटी अमेरिकन डॉलर्सची तरतूद केली आहे. त्यांनी जाहीर केलं की, लॉकडाऊनमुळे जे उद्योगधंदे बंद झाले त्याचा फटका विद्यार्थी, नोकरी करून शिकणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. त्यांचं शिक्षण धोक्यात येऊ शकतं. शिक्षण थांबता कामा नये; त्यासाठी त्यांनी ‘कॅनडा इमर्जन्सी स्टुडंट बेनिफीट’ या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दरमहा निधीची घोषणा केली आहे.
माध्यमिक स्तरच्या पुढचं शिक्षण घेणाºया पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. मे ते आॅगस्ट या काळात दरमहा १२५० डॉलर्स मिळणार आहेत. ज्यांच्यावर पालक अवलंबून आहेत किंवा जे दिव्यांग आहेत, त्यांना दरमहा १७५० डॉलर्स मिळतील. जे शाळेत आहेत व ते सप्टेंबरमध्ये कॉलेज, विद्यापीठात जाणार आहेत, त्यांनाही रक्कम मिळणार असून, ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यांनाही योजनेचा फायदा होईल. जी मुलं कमावतात; पण दरमहा हजार डॉलर्सपेक्षा कमी वेतन मिळतं, त्यांनाही अर्ज करता येणार आहे. जे रिसर्च स्कॉलर आहेत, ज्यांना स्कॉलरशिप, फेलोशिप मिळतात, त्यांनाही शासन मदत करणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी ७६ हजार नोकºया तयार करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे; त्यासाठी काम सुरू असल्याचंही पंतप्रधान ट्रुडो यांनी सांगितलं. मात्र, या योजनांसह त्यांनी तरुणांना जे सांगितलं तेही महत्त्वाचं आहे. ते सांगतात, ‘संकट मोठं आहे, तुमच्या हातात आज नोकºया नसतील, आहेत त्या जातील की काय, याचं भय असेल. पालकांकडे पैसे मागावेत असंही तुमच्या मनात आलं असेल; पण त्यांचेही हात तंग असतील; त्यामुळे पुढे काय हा प्रश्न आहेच. म्हणून आम्ही तुम्हाला मदत करायचे ठरवलं. तुम्ही देशाचं भविष्य आहात, आज देश संकटात असून, तुम्हाला मदत करतो आहे. तुम्ही देशासाठी, आई-वडिलांसाठी काय करू शकाल, याचा विचार करा. देश तुमच्याकडे आशेनं पाहतो आहे.’ त्यांचं भाषण, तरुणांसाठीच्या योजना याचं जगभर कौतुक होत आहे.
त्यांच केस डोळ्यावरून बाजूला सारणं म्हणजे फ्लिप करणं गाजलं. मात्र, त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातल्या तरुणांना वेळीच आधार द्यावा, असं पंतप्रधानांना वाटलं, हेच कोरोना कोंडीच्या काळात महत्त्वाचं व पुरेसं बोलकं आहे.